Bank Fraud : नगर अर्बन बँक घोटाळ्याचा पैसा देशाबाहेर गेल्याचा संशय

  

गांधी फिनकॉर्पची चौकशी करा : लांडगे 



नगर : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या दीडशे कोटीच्या कर्ज घोटाळ्याच्या तपासात गांधी फिनकॉर्प लिमिटेड या कंपनीची चौकशी करावी, बँकेतील पैशाची विल्हेवाट लावण्यात आली त्याच काळात या कंपनीची स्थापना झाली आहे. कंपनीच्या भागभांडवलासाठी वापरलेली अडीच कोटींची रक्कम बँकेच्या घोटाळ्यातीलच असावी, याच कंपनीमार्फत बँकेच्या घोटाळ्यातील रकमा देशाबाहेर नेल्याची शक्यता आहे, असा दावा आशुतोष लांडगे यांनी केला आहे.


 आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास निवेदनाद्वारे केलेल्या मागणीत लांडगे यांनी म्हटले आहे की, या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे तातडीने पडताळावीत. तत्कालीन चेअरमन माजी खासदार दिलीप गांधी व बँक कर्मचाऱ्यांनी माझ्या परस्पर व इतर खातेदारांच्या खात्यातून आणि कर्ज वेगवेगळ्या इतर खात्यात पैसे वर्ग करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गांधी फिनकॉर्प लिमिटेड कंपनी २०१७ मध्ये म्हणजेच बँकेत कर्ज फसवणूक झालेल्या वर्षी स्थापित झालेली आहे. या कंपनीच्या भागभांडवलाचे अडीच कोटी अर्बन बँक घोटाळ्यातीलच असण्याची दाट शक्यता आहे.

 बँक घोटाळ्यातील रोख रक्कम मुख्य आरोपीचे मुले सुवेंद्र दिलीप गांधी, देवेंद्र दिलीप गांधी व त्यांचे भागीदार जयदीप पाटील यांनी गांधी फिनकॉर्प या कंपनीमार्फत देशाबाहेर नेऊन विल्हेवाट लावली असावी. प्रकरण टाळण्यासाठी सुवेंद्र दिलीप गांधी बँकेच्या रकमा कोर्ट किंवा या प्रकरणातील फिर्यादीकडे जमा करण्याची दाट शक्यता आहे. याची सखोल चौकशी होऊन अर्बन बँकेच्या घोटाळ्यातील रोख रकमांची कशी विल्हेवाट लावली, याची शहानिशा होणे आवश्‍यक आहे. यासाठी सुवेंद्र गांधी व देवेंद्र गांधी यांची चौकशी केल्यास अर्बन बँकेच्या दीडशे कोटी घोटाळ्यातील पडद्यामागचे मुख्य सूत्रधार समोर येणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या