अवैध वाळूचा डंपर उलटून एक ठार; चौघे जखमी

 पोलिसांनी डंपर व वाळू घेतली ताब्यात; पंचनामा सुरू



खैरी निमगांव : राज्यातील पहिला शासकीय वाळू डेपो ज्या तालुक्यात सुरू झाला. त्याच श्रीरामपूर तालुक्यातील वाळू तस्करी थांबवण्यात प्रशासनाला अपयश आले आहे.  खैरी निमगांव येथे सकाळी सहाच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणारे अतिजलद ढंपर उलटून त्याखाली एक जण दबून ठार झाल्याची घटना आज गुरुवार (दि. १७) रोजी घडली. विशेष म्हणजे अपघातानंतर विना क्रमांकाचा डंपर, त्यातील वाळू ही पंचनाम्यापूर्वीच गायब झाल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेतला. 




शफीक अहमद पठाण, रा. उक्कलगांव असे वाळूच्या ढंपरखाली दबून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोदावरी नदी पात्रातून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रॅक्टरद्वारे तसेच ढंपरद्वारे वाळू उपसा केला जातो. या भागात वाळूचे अनेक पाँईट असुन काही दिवसापुर्वी याच भागातील नायगाव डेपो शासनाने ताब्यात घेऊन वाळू धोरण राबवले होते. या धोरणानुसार नागरीकांना स्वस्तात वाळू मिळाली नसल्याने या धोरणात शासन अपयशी ठरल्याने चोरट्या वाळूला मागणी दिसुन आली आहे. असे असताना शासनाला ही चोरटी वाळू रोखता आली नाही.  असाच वाळू उपसा करणारे विनाक्रमांकाचे ढंपर गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नदीतून वाळू घेऊन येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने खैरी निमगांव येथे उलटले त्यात एकजण ठार झाला तर उर्वरीत तिन - चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना प्रत्यक्ष दर्शींच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले. 

अपघातानंतर काही वेळातच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निकम व पोलीस नाईक प्रशांत रन्नवरे घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही प्रमाणात रस्ता अडला होता. डंपर हटवून तो सुरू करण्यात आला. 

  ________



ढंपरला क्रमांकच नाही 

श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात शासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून रोज शेकडो ट्रॅक्टरने आणी ढंपरने हजारो ब्रास वाळू उपसा केला जातो. या वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर  ट्रॉलीला तसेच ढंपरला कुठल्याही प्रकारचा क्रमांक आढळून येत नाही. वाळू तस्करी करणाऱ्या चालक व मालकाचे अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याने हा धंदा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या