कोल्हापूर/ सांगोला: निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे याचा बुधवारी धारदार शस्त्राने वार करून अमानुष खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून खुनाच्या तपासासाठी सांगोला पोलिसांनी चंदनशिवे यांचे जुने मित्र असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील शिक्षक कॉलनीत २०१६ साली मार्च मध्ये झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयित आणि सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतून सुरज चंदनशिवे याचं निलंबन करण्यात आलं होतं. त्या प्रकरणाचा तपास सांगली व कोल्हापूर येथील स्थानिक पोलिस यंत्रणा करत आहे. चंदनशिवे यांचा मृत्यू झाल्यानं आता वारणानगर चोरी प्रकरणाचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरज चंदनशिवे हे वासूद गावचे रहिवासी असून वारणानगर येथील मार्च २०१६ साली शिक्षक कॉलनीत झालेल्या नऊ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणातील संशयित आणि सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ते निलंबित सहायक पोलिस निरीक्षक होते. ते सध्या सांगली येथील पोलिस ठाण्यात रोज वासूद येथून जात होते. त्यांनी सध्या कासेगाव ता. पंढरपूर येथे दूध संकलनाचा प्रकल्पही सुरू केला होता.यामुळे सुरज चंदनशिवे रोज वासूद येथे मुक्कामी होते.
सायंकाळी जेवण झाल्यावर केदारवाडी रस्त्याने ते चालत निघाले होते. रात्री ११ च्या सुमारास ते केदारवाडी रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत होते. त्याचवेळी अज्ञात व्यक्तींनी मागून येऊन त्यांच्या डोक्यावर, मानेवर धारदार शस्त्राने वार केले. खून केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांचा मृतदेह ओढत नेऊन उसाच्या शेतात पालथा टाकला. तर रस्त्यावरून उसापर्यंत फरपटत आणल्याने रक्तही सांडलेल्याच्या खुणा दिसत होत्या.सुरज चंदनशिवे यांच्या खुनानंतर त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळी व ग्रामस्थांनी घटनास्थळावर सकाळी मोठी गर्दी केली होती.
0 टिप्पण्या