67 वाहने 50 ब्रास वाळू जप्त... वाळू तस्करांचे कोंबिंग ऑपरेशन...
जळगाव : ट्रकमधून गोमास वाहतूक केली जात असल्याच्या संशयाने तीन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात जमावाने एक ट्रक पेटविला. पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. नंतर हा ट्रक चामडी घेऊन एका कारखान्याकडे जात असल्याचे निष्पन्न झाले. मात्र ट्रकवर दगडफेक करणारे आणि पोलिसांवर हल्ला करणारे बहुतेक वाळू तस्कर होते. पोलिसांच्या गाडीवर हल्ला करण्यापत वाळूतस्करांची मजल गेल्याने पोलिसांनी महसूल व परिवहन खात्याच्या संयुक्त विद्यमाने बांभोरी गावात वाळू तस्करांचे कोंबिंग ऑपरेशन केले. त्यात तब्बल 67 वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली.
ताब्यात घेतलेली बहुतेक वाहने गावातून, वाहन मालकांच्या घरासमोरून ताब्यात घेतल्याने त्यांची कागदपत्रे तपासून सोडण्यात आली. काही वाहने मात्र वाळूसह पोलिसांच्या ताब्यात आहेत. भल्या पहाटे पोलिसांच्या या बेधडक कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील बेसुमार अवैध वाळू उपसा नेहमीच चर्चेत असतो. गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी मुद्दा राज्यभरात गाजतो दरम्यान नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आल्यापासून अवैध वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली जात असून शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात केलेली सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली.
बांभोरी गावातून ५३ ट्रॅक्टर व १४ ट्रक, डंपर जप्त केले. तसेच ठिकठिकाणी साठवून ठेवलेली ५० ब्रास वाळूदेखील जप्त करण्यात आली आहे.पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने पहाटे पाच वाजताच गावात पोहोचले व कारवाईची धडक मोहीम राबवली.
कारवाई नंतर या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याविषयी चौकशी सुरू असून या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, ट्रक जाळपोळ प्रकरणी प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी आप्पासाहेब पवार यांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काही आरोपींना अटक देखील करण्यात आली असून प्रशासनाने हा प्रकार अतिशय गांभीर्याने घेतला आहे.
0 टिप्पण्या