विनयभंगातील आरोपीला मदत करण्यासाठी मागितले पैसे!
आरोपी हवालदार संदीप गडाख व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ |
लाख रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल
शिर्डी : विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच तडीपारी व एमपीडीए अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या नावाने दीड लाख रुपये तसेच स्वतः 30 हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार संदीप गडाख (वय 40) याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 वर्षीय तक्रारदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मदत करण्यासाठी निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासाठी हवालदार गडाख याने तक्रारदाराकडे दीड लाख रुपयाची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली.
याप्रकरणी तक्रारदाराने दिलेले फिर्यादीनुसार सापळा लावण्यात आला. 26 ऑगस्ट रोजी गडाख याने स्वतः 30 हजार रुपये व पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यासाठी एक लाख रुपये घेताना सापळा लावल्याचा अंदाज आल्याने मात्र लाच स्वीकारली नाही.
याप्रकरणी भ्र. प्र.अधि.1988 चे कलम 7अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिकच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस उपअधिक्षक वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद हेंबाडे, राजेंद्र गीते, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान गडाख याच्यावर यापूर्वीही लाचखोरीची कारवाई झाल्याचे समजते.
0 टिप्पण्या