Breaking News: महसूल पथकावर वाळू तस्करांचा प्राण घातक हल्ला..!

 

आठ ते दहा जणांनी केली विटा दगडाने मारहाण..!



स्थानिक रहिवासी महिलांनी वाचविले तलाठी मंडलाधिकाऱ्यांचे प्राण


श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील घटनेचा सर्वत्र निषेध


महसूल चे काम बंद आंदोलन




श्रीरामपूर : महसूल खात्याने जप्त केलेली वाळू रात्रीतून पळविण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू तस्करांनी विटा आणि दगडांनी प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी शिवाजी दरेकर गंभीर जखमी झाले तर मंडलाधिकारी बाळासाहेब वायखिंडे आणि तलाठी बाळासाहेब कदम यांनाही मार लागला आहे. पोलीस वेळेत न आल्याने महसूल पथकाला मारहाण करीत वाळूच्या डंपरची चावी घेऊन तस्करांनी डंपर पळवून नेला. 


याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. जखमी शिवाजी दरेकर हे पढेगाव येथील तलाठी आहेत. तर बाळासाहेब कदम मालुंजे येथील तलाठी आहे. भेर्डापूर कदम यांच्या हद्दीत येते. दोन दिवसांपूर्वी कदम यांनी स्मशानभूमी जवळ 15 ते 16 ब्रास वाळू साठा जप्त करत ग्रामपंचायतच्या ताब्यात दिला होता. 

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास ही वाळू कुणीतरी डंपरमध्ये भरत असल्याची माहिती सरपंच अनिता चंद्रकांत कांदळकर यांनी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना दिली. त्यांनी तातडीने श्रीरामपूर तालुका पोलिसांना माहिती देत महसूलचे पथक भेर्डापूरकडे रवाना केले. त्यात उंदीरगावचे सर्कल बाळासाहेब वायखिंडे, तलाठी बाळासाहेब कदम आणि शिवाजी दरेकर यांचा समावेश होता. पोलिसांनी या पथकाला 'तुम्ही पुढे जा आम्ही नंतर येतो', असे सांगितले. मात्र पोलीस वेळेत पोहोचले नाही. 


महसूल पथक पोहोचल्यानंतर काही लोक डंपरमध्ये वाळू भरत असल्याचे दिसले. त्यांच्याकडे चौकशी करताच ते पळून गेले. याची माहिती महसूल पथकाने तहसीलदारांना दिली. नाय


ब तहसीलदार वाकचौरे यांनी पोलीस उपनिरीक्षक निकम तसेच पोलीस पठाण यांना तातडीने घटनास्थळी जाण्यास सांगितले. दरम्यान, तोपर्यंत एका जीपमध्ये काही लोक तेथे आले. जीप काही अंतरावर लावून ते महसूल पथकावर चालून आले. महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली. काहींनी विटा तसेच दगडाने मारहाण केली. डंपरची चावी शिवाजी दरेकर यांच्याकडे होती. त्यांना जबर मारहाण करून चावी हिस्कावली. 

दरम्यान, आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक महिला जमा झाले. त्यांनी महसूल पथकाला हल्लेखोरांच्या तावडीतून वाचविले. महसूल पथक श्रीरामपूरकडे रवाना झाले, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. हरेगाव येथील ॲट्रॉसिटीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तामुळे पोलिसांना घटनास्थळी जाण्यास उशीर झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हल्लेखोरांनी डंपर पळविला.



महसूल कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे श्रीरामपूर तहसील व प्रांत अधिकारी कार्यालयात काम बंद आंदोलन करण्यात आले. महसूल विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला. गुन्हा दाखल झाला असला तरी हल्लेखोर कोण? हे अद्याप समजलेले नाही. कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेत आरोपी नेहमी सुटतात. कारवाई करण्यासाठी केलेल्या महसूल पथकाचा जीव धोक्यात असतो. त्यांना वेळेत संरक्षण मिळत नाही, त्यामुळे काम करायचे कसे असा प्रश्न महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या