Murder : सहा हल्लेखोर आणि आठवलेवर २५ वार...

 अंबड पोलीस चौकीसमोर भरबाजारात हत्येचा थरार! महिनाभर चौथा खून 

संदीप आठवलेनाशिक : शहरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसून पुन्हा अंबड  पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक येथे एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या झाली. दोन दुचाकींवर आलेल्या सहा हल्लेखोरांनी पोलीस चौकी समोरच संदीप आठवले (२२) या भाजीविक्रेत्या युवकाचा खून झाला. अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने २५ पेक्षा जास्त वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचे सत्र घडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खूनाची ही चौथी घटना आहे. 

संदीप प्रकाश आठवले (२३, रा. सिडको) असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप आठवले हा शिवाजी चौकात असताना दोन दुचाक्यांवरून सहा संशयित आले.

त्यांनी काही दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरात झालेल्या भांडणाची कुरापत काढून वाद घातला. त्यातून संशयितांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी संदीपवर वार केले. तर एकाने चाकूच संदीपच्या पोटात भोसकला.

संदीप कोसळताच संशयितांनी पोबारा केला. जखमी संदीपला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात तीन संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. संशयितांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

दरम्यान, अंबड पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच गुन्हेगारी बोकाळली असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने गुन्हेगारांचीच दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या