उद्योग मंत्री उदय सामंत यांची स्पष्टोक्ती...
Story by Harshal Joshi
नाशिक : एकीकडे राज्यातल्या उद्योग राज्याबाहेर बाहेर जात असताना नाशिकमध्ये येणारा सोलर टेस्टिंग लॅब देखील इतरत्र हलवण्याबाबत पत्रकारांनी विचारले असता हा प्रकल्प नाशिकमध्ये उभारला जाईल त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना केले.
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेले उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सत्तेतील नाराज झालेल्या आमदारांबाबत प्रश्न विचारले. त्यावर भरत गोगावले यांची कुठलीही नाराजी नाही. त्यांनी विनोदातून वक्तव्य केले असल्याचे ना. सामंत यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या डिनर डिप्लोमसीमध्ये बच्चू कडूंना निमंत्रण नसल्याने ते नाराज असल्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेन, असे प्रतिपादन केले आहे. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना नामदार सामंत म्हणाले, 'आमच्या पक्षात तसेच सरकारमध्ये कोणी नाराजी नसून सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न आहे, नाराज असल्याच्या अफवांचा त्यांनी इन्कार केला.
खराब रस्त्यांबाबत प्रश्न विचारला असता सामंत म्हणाले, पूर्वी मुंबई नाशिक रस्त्याची दुरावस्था होती. या रस्त्यावरून प्रवासासाठी सहा तास लागत. आता हा प्रवास तीन तासात होतो. काही ठिकाणी पावसामुळे रस्ते खराब होत आहेत. त्याची दुरुस्तीही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सुरू आहे. शरद पवार यांच्या राज्यभर आयोजित केल्या जाणाऱ्या सभांबद्दल प्रतिक्रिया देताना उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, कोणी कुठे सभा घ्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार वेगवान पद्धतीने काम करत आहे. सामान्य माणसाच्या समस्या वेळेत सोडवल्या जात आहेत. विरोधकांनीही जनहिताच्या सूचना करायला हरकत नाही.
0 टिप्पण्या