शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत आणि कार्यकर्त्यांकडून विरोध
महविकास आघाडीत अंतर्विरोध वाढला
पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, उपरणं, मानचिन्ह आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना 41 वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. टिळकांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराने जबाबदारी वाढली, अशी भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी पुरस्काराची रक्कम 'नमामि गंगे' अभियानाला दान केली.
पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर मोदी आणि भाजपविरोधी आघाडीतल्या दोन नेत्यांची म्हणजे शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदेंची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. एकीकडे जंगी स्वागत तर दुसरीकडे प्रचंड विरोध असे चित्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान पुणेकरांना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे विरोधी पक्षाचे नेते शरद पवार मोदी यांच्या स्वागताला व्यासपीठावर होते तर त्यांचे अनुयायी रस्त्यावर काळे कपडे परिधान करून काळे फलक दाखवित 'मोदी गो बॅक' असे नारे देत होते. शरद पवारांच्या भूमिकेवरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यावर टीका केली. यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्विरोध वाढल्याचे दिसून आले.
पुरस्काराला उत्तर देताना मोदी म्हणाले, कुठलाही पुरस्कार मिळतो, तेव्हा जबाबदारी वाढते. मला मिळालेल्या पुरस्काराला लोकमान्य टिळकांचं नाव जुळलंय. त्यामुळं माझी जबाबदारी कैक पटीनं वाढली. हा पुरस्कार 140 कोटी जनतेला समर्पित करतो. या पुरस्कारातून मिळालेली एक लाखाची रक्कम आपण 'नमामि गंगे' प्रकल्पासाठी देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. छत्रपती शिवराय, फुले, टिळक, चाफेकर अशा महान नेत्यांची महाराष्ट्र ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत, या पुण्यनगरीत येण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो, असे उद्गार त्यांनी काढले.
दरवर्षी पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार दिला जातो. टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार येतो. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला 1 ऑगस्ट 1983 पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. 1983 पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो.
यापूर्वी हा पुरस्कार इंदिरा गांधी (मरणोत्तर), शरद पवार, श्रीपाद अमृत डांगे, अच्युतराव पटवर्धन, खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर), मधु लिमये, पांडुरंगशास्त्री आठवले, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, टी. एन. शेषन यांच्यासारख्या महान व्यक्तींना देण्यात आला आहे.
_______
दगडूशेठ मंदिराजवळ झळकविला कर्जत जामखेड एमआयडीसीचा फलक
मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान दगडूशेठ गणपती मंदिराजवळ कर्जत जामखेड तालुक्यातील युवकांनी एमआयडीसी मागणीचा फलक झळकवला. फलकांवर "आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासन हे कर्जत - जामखेड येथील एमआयडीसी संदर्भात वेळकाढूपणा करत आहे. आपण देशाचे मोठे नेते आहात युवकांचा विचार करून एमआयडीसी संदर्भात तातडीने योग्य निर्देश देऊन मान्यता द्यावी ही विनंती. सर्वसामान्य युवक कर्जत जामखेड", अशा पद्धतीने मजकूर लिहिलेला होता.
0 टिप्पण्या