Breaking News

जमीन बळकवल्याच्या गुन्ह्यात दुय्यम निबंधकासह स्टॅम्प वेंडरही आरोपी

 


पोलिसांनी काढली चौघा आरोपींची धिंड...
नगरचे प्रशासन येवला पोलिसांचा आदर्श घेणार का..? 
आरोपींची शहरातून धिंड काढताना येवला पोलीस


जबरदस्तीने खोटे खरेदी खत तयार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यातल्या येवला येथे उघडकीस आला. या गुन्ह्यात दुय्यम निबंधकासह स्टॅम्प वेंडरलाही आरोपी करण्यात आले आहे. दमदाटी करून जमिनी बळकवणाऱ्याची दहशत संपवण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींची शहरातून धिंड काढली. या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून जमिनी बळकवणाऱ्या अशा टोळ्या सर्वच जिल्ह्यात आहेत. खरेदी विक्री अधिकारी त्यांना पाठीशी घालतात, प्रत्येक ठिकाणी आशा कारवाया होण्याची गरज आहे. 


येवला शहर पोलिस ठाण्यात जबरदस्तीने खोटे दस्तऐवज बनवून जमीन खरेदी करण्यात आली. याप्रकरणी तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४ आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींना देखील लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याच गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपींची गंगा दरवाजा ते पोलीस स्टेशन या मार्गावर धिंड काढण्यात आली.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसावा म्हणून पोलिसांनी आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे,. याचाच एक भाग म्हणून आरोपींची शहरातून थेट धिंड काढली जात आहे. याद्वारे पोलिसांचा वचक निर्माण व्हावा आणि कुणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, असा उद्देश आहे.


शहरात सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे कायदा व्यवस्था धोक्यात येत आहे. त्याचा ताण पोलीस यंत्रणेवर वाढत असल्यामुळे गुन्हेगारांना जरब बसावा यासाठी ही धिंड काढण्यात आली. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या पुढे कोणाचीही गय केली जाणार नाही. नागरिकांनी अशा आरोपींविषयी माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी केली आहे.

निवृत्ती महाले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात मुख्य आरोपी सचिन पाटील यांच्यासह दुय्यम निबंधक भागवत गायकवाड, दुय्यम निबंधक दिलीप निहाळी, दस्त लेखक शुभम मुंडे, दस्त लिहून घेणार राहुल खैरनार, साक्षीदार बबन अहिरे, मनोज बिडवे, अनिल गवारे, ऋतिक आहेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपी सचिन पाटीलने महाले यांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून बनावट खरेदीखत केले व एक लाखांची खंडणी मागितली. 

याप्रकरणी पोलिसांनी शुभम मुंडे व राकेश येवले या दोघांना अटक केली असून त्यांना दोन सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

हा गुन्हा दाखल होताच आणखीही फिर्यादी पुढे येऊ लागले आहेत. विरार येथील एका महिलेने बंदुकीचा धाक दाखवून त्यांची जमीन बळजबरीने खरेदी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातही दुय्यम निबंधक गायकवाड यांच्यासह काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्यातील अनेक जिल्ह्यात अशा जमिनी भडकावणाऱ्या व सामान्य माणसाला खंडणी मागणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. खरेदी विक्री व्यवहार नोंदवणारे निबंधक व त्यांचे हसतात चिरीमिरी साठी अशा टोळ्यांना पाठीशी घालत असल्याचे लोक उघडपणे बोलतात. नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात अशा टोळ्या सक्रिय आहेत. येथील प्रशासन त्यांच्यावर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. 

Post a Comment

0 Comments