बारामतीच्या समरीन सय्यदची गगनभरारी..

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त" म्हणून निवड..





बारामती :
बारामती तालुक्यातील सस्तेवाडी गावातील रहिवासी असलेल्या समरीन सलीम सय्यद यांची "बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सहाय्यक आयुक्त" म्हणून निवड झाली आहे. 


 नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समरीनने हे यश मिळवले आहे. बारामती तालुक्यातल्या सस्तेवाडीसारख्या गावातील समरीनने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

समरीन सय्यद ही सध्या वाशिम येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर कार्यरत आहे. तिने नुकतीच राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून समरीनची मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी निवड झाली आहे. समरीनच्या या यशानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

समरीन ही बारामती तालुक्यातील सस्तेवाडी येथील रहिवासी आहे. तिचे शालेय शिक्षण सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर विद्यालयात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात झाले. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला.  स्पर्धा परीक्षेतून तिला सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून संधी मिळाली.

गेल्या पाच वर्षांपासून समरीन ही वाशिम येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या दरम्यान तिचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरूच होता. त्यातूनच तिने मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदापर्यंत मजल मारली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. आईवडिलांसह कुटुंबियांची साथ, विविध तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवता आल्याचं समरीनने  सांगितले.



"५ वर्षापासून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून त्या सध्या वाशिम जिल्ह्यात कार्यरत होत्या. समरीन ही महाराष्ट्रातील टॉप कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील आयटी इंजिनिअर आहे. ती लहानपणापासूनच विद्वान आहे. तिच्या संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांनी तिला साथ दिली. ती खूप मेहनती आणि समर्पित आहे. तिचे शालेय शिक्षण सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर येथून झाले आणि बारामतीच्या तुळाजाराम चतुरचंद महाविद्यालयातून बारावी झाली."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या