महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट विचारात घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन चर्चा करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार |
राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे राज्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झाले असून पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झालं असून त्यामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिति ओढवली असल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याबाबत विनंती केली असल्याचे मंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळं नाशिक व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने १२२ वर्षातील कोरडा ऑगस्ट ठरला आहे. पाऊस नसल्याने शेतकरीही चिंतातूर झाला आहे तर, धरणातही पाणीसाठा नाहीये. विक्रमी पाऊस असणाऱ्या सुरगाणा व पश्चिम पट्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळं पश्चिम वाहिनी नदीवरील धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे परिणामी धरणे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खो-यातील समूहातील एकही धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने पिण्याचा पाण्याचा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी म्हटले आहे.
या वर्षी खरीप पेरणीसाठी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. परंतु पडलेल्या अत्यल्प पावसावर जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र पेरण्या झाल्यानंतर पेरलेले बियाणे उगवणार की नाही अशी एकवेळ अवस्था होती. परंतु कसेबसे पेरलेले उगवले व सर्वच पिके जोमात असताना पुन्हा पावसाने ओढ दिल्याने मागील ३० दिवसांपासून पाऊस न झाल्यामुळे निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला. शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु पुरेसा पाऊस झाला नसल्याने पुन्हा दुबार पेरणीच संकट ओढवले आहे. परिणामी शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात कोरडा दुष्काळाची भीषणता जाणवू लागली असून कर्जाने पैसे घेवून शेतकर्यांनी मशागत करून पेरणी केली मात्र पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून मका, ऊस, द्राक्षबागा,फळबागा,बाजरी, ज्वारी, भूईमुग, कांदा यांच्यासह खरीपातील विविध पिकांचे मोठे नुकसान झाले असून अर्थातच खरीप हंगाम हातचा गेला आहे. अनेक ठिकाणी जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई जानवू लागली आहे. याचा मोठा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होणार असून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचे पैसे आणि मेहनत दोन्हीही वाया जाणार असून बळीराजा आर्थिक अडचणीत सापडणार आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या ३० दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने अपु-या पावसामुळे धरणांतील पाणी साठा देखील पुर्ण क्षमतेने भरला नाही त्यामुळे अनेक गावांमध्ये आजमितीस जिल्हयातील ५४ मंडळा मध्ये अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण चिंता डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली आहे. अशा चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या आवाहनानुसार शेतकर्यांनी खरीप पिकांचा विमा काढलेला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील आहे तरीदेखील परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेता शासनाने विमा कंपन्यांना शेतक-यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती मदत व नुकसान भरपाई देण्याबाबत तसेच ही एकंदरीत परिस्थिती पाहता राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात केली.
0 टिप्पण्या