राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला :गिरीश महाजनांचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी

 राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आंदोलनाची धग अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा नांदेडमध्ये बसकल मराठा समाजाकडून अडवण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महाजन यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने महाजन हे शहरात आले होते.


नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या ताफ्यावर समोर सकल मराठा समाजाकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. काळे झेंडे दाखवून पालकमंत्री चलेजावच्या घोषणा देण्यात आल्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजीत शासकीय कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन नांदेडला आले होते. दरम्यान, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात लोकप्रतीनिधी आणि पालकमंत्र्यानी सहभागी होऊ नये, असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळपासूनच सकल मराठा समाजबांधव कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. तर, पालकमंत्र्यांचा ताफा येताच काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकाना ताब्यात घेतले. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणास पालकमंत्र्यांनी येऊ नये, आमचा त्यास विरोध राहील, असा इशारा सकल मराठा समाजाने आधीच दिला होता. तसेच प्रशासनाने ध्वजारोहण करावे असेही सांगण्यात आले होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल मराठा समाज बांधवाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली होती. तर यावेळी, मराठा समाजातील अनेक बांधवांनी जिल्हाधिकारी यांना प्रशासन आणि समाज बांधवांमध्ये समन्वय आहे, तसा समन्वय लोकप्रतिनिधी आणि समाज बांधवांमध्ये नाही, त्यामुळे समाजात लोकप्रतिनिधींविरुद्ध प्रचंड रोष असल्याचे सांगितले. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शासकीय इतमामात ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केल्या जातो, परंतु यावेळी मात्र या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला लोकप्रतिनिधींनी येऊन आपली पोळी भाजून घेऊ नये, असा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला होता. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त....

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहणास पालकमंत्र्यांनी येऊ नये, आमचा त्यास विरोध राहील असा इशारा सकल मराठा समाजाने आधीच दिला होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कार्यक्रमाच्या स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या