२० देशांच्या समूहाच्या म्हणजेच जी २० शिखर परिषदेचे सूप अखेर वाजले. दिल्लीत झालेल्या या शिखर परिषदेच्या निमित्ताने जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी भारतात आले आणि त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. या शिखर परिषदेचे यजमानपद पहिल्यांदाच भारताकडे आले होते कारण यावर्षी भारताकडे जी २० चे अध्यक्षपद होते. भारताने या शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन करून आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो हे जगाला दाखवून दिले आहे. इतकेच नाही तर भारत जगाचे नेतृत्व करू शकतो हे ही भारताने जगाला दाखवून दिले.
जी २० समूहामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, रशिया, चीन असे जगातील सर्व प्रगत देशांचा समावेश आहे त्यातील अमेरिका, चीन आणि रशिया या तर महासत्ता आहेत. भारताने ज्या प्रकारे या समूहाचे नेतृत्व केले त्यामुळे भारतही आगामी काळात जागतिक महासत्ता होऊ शकतो याची चुणूक दिसली. या शिखर परिषदेत भारताचे सर्वात मोठे यश म्हणजे भारताने जी २० शिखर परिषदेच्या जाहीरनाम्यावर सर्व देशांचे एकमत घडवून आणले. सध्याचे जागतिक राजकारण पाहिले तर जग दोन गटात विभागले गेले आहे. हे दोन गट या समूहातही आहेत त्यामुळे या समूहातील वीस देशांचे या जाहिरनाम्यावर एकमत होणे अवघड आहे असे जाणकारांचे म्हणणे होते. आज जग दोन गटात विभागले गेले आहे विशेषतः रशिया युक्रेन युद्धानंतर चीन रशिया आणि त्यांना मानणारे देश एककिडे तर अमेरिका आणि युरोपियन देश एककिडे अशी परिस्थिती आहे विशेष म्हणजे हे सर्व देश जी २० चे सदस्य आहेत त्यामुळे त्यांच्याच एकमत होणे अशक्य आहे असेच मानले जात होते मात्र भारताने मुत्सद्देगिरी दाखवत सर्व देशांचे एकमत घडवून आणले. हे करताना या जाहिरनाम्यात युक्रेन रशिया युद्धाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी रशियाचा युद्धखोर देश असा कोठेही उल्लेख करण्यात आला नाही त्यामुळे रशिया चीन यांनी या जाहिरनाम्याला पाठिंबा दिला. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मायक्रोन हे या जाहीरनाम्यावर नाखूष होते कारण यात युक्रेनमधील युद्ध असे लिहिले होते मायक्रोन यांच्या मते तिथे युक्रेनमधील असा शब्दप्रयोग न करता युरोपमधील युद्ध असा शब्द हवा मात्र भारताने त्यांची समजूत काढली. भारताच्या मुत्सद्देगिरीने जी २० चा जाहीरनामाही पारित झाला आणि रशियाही नाराज झाला नाही एकूणच हा जाहीरनामा तयार करताना भारताने जी मुत्सद्देगिरी दाखवली तिचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व या शिखर परिषदेत आणखी उजळून निघाले. त्यांच्या भाषणाला सर्व देशांच्या प्रमुखांनी जी दाद दिली त्यामुळे नरेंद्र मोदी आता जागतिक नेते बनले आहेत हे अधोरेखित झाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जी २० परिषद ही भू राजकीय मुद्दे सोडवणारा मंच नाही असे ठणकावून सांगितले हे सांगतानाच त्यांनी शांततेचा पुरस्कार केला. पंतप्रधान मोदींनी या शिखर परिषदेदरम्यान सर्व देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली त्यामुळे अनेक देशांशी आपले करार झाले. अनेक देशांनी भारतात गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली. परदेशी गुंतवणूक वाढल्यास भारताची अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते त्यामुळे भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकते. भारताच्या दृष्टीने ही शिखर परिषद खूप महत्वाची ठरली. जी २० शिखर परिषदेत आफ्रिकन युनियनलाही सहभागी करून घ्यावे अशी भारताची इच्छा होती. ही इच्छा यावेळी पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे आफ्रिकन युनियनला जी २० चे कवाडे उघडली आहेत त्यामुळे यापुढे या समूहाचे नाव जी २० नसून जी २१ असे होईल.
आफ्रिकन युनियनला या समूहात सहभागी करून घेणे हे भारताचे मोठे राजनैतिक यश आहे कारण त्यामुळे संपूर्ण आफ्रिकन युनियनचा पाठिंबा भारताला मिळेल. जी २० समूहातील देश, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियनमधील सर्व देशांनी भारताचे नेतृत्व मान्य केल्याची पोच पावतीच या शिखर परिषदेतून मिळाली आहे अर्थात त्यामुळे चीनचा जळफळाट होणार हे उघड आहे मात्र चीनच्या जळफळाटीकडे भारतासह जगातील सर्वच देशांनी दुर्लक्ष केले आहे. भारत जगाचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे हे जगाने आता मान्य केले असून भविष्यात भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास येणार हे देखील जी शिखर परिषदेने दाखवून दिले आहे.
0 टिप्पण्या