दप्तर तपासणीमुळे तलाठ्यांचे धाबे दणाणले...!

साठेखतावरून सातबारा केले तयार... शासनाचा महसूल बुडविलाप्रदिप रासकर l राष्ट्र सह्याद्री 

 निमगाव भोगी : शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी काही दिवसांपुर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे शिरुर तालुक्यात काही तलाठ्यांनी शासकीय दप्तरात खाडाखोड केली. तसेच एक व दोन गुंठ्याचे स्वतंत्र तुकडे पाडून बेकायदेशीर नोंदी घातल्या. व त्या वरिष्ठांनी मंजुरही केल्या. तसेच काही तलाठ्यांनी फक्त साठे खतावरून सातबारा तयार केले व शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याची लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत अशोक भोरडे यांनी केलेल्या या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याचे पुण्याचे उपजिल्हाधिकारी (कुळकायदा) यांनी भोरडे यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत पुढीलप्रमाणे काही दिवसांपुर्वी शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी शिरूर तालुक्यातील पाच तलाठ्यांच्या दप्तर तपासकामी स्वतंत्र पथक तयार करून या तपासणी पथकाचे प्रमुख म्हणुन तहसीलदार (संगायो) अजित पाटील आणि नायब तहसीलदार अप्पर तहसिल पिंपरी- चिंचवड प्रविण ढमाले, तसेच तपासणी अधिकारी/ कर्मचारी म्हणुन अव्वल कारकून राजकुमार लांडगे, काकासाहेब शिक्केतोड, सचिन चव्हाण, जितेंद्र पाटील, महसूल सहायक अलीमोद्दीन काझी, रोहन देवरे यांचे पथक तयार करून शिरूर तालुक्यातील त्या पाच तलाठ्यांच्या दप्तर तपासणीचे आदेश दिले होते.

शिरूर तालुक्यातील काही तलाठ्यांनी शासकीय दप्तरामध्ये खाडाखोड केली. तसेच एक व दोन गुंठयाचे स्वतंत्र तुकडे पाडून नोंदी घातल्या. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजुरही केल्या. काही तलाठ्यांनी फक्त साठे खतावरून सातबारे तयार केले व शासनाचा महसूल बुडविला. तसेच काही सामाईक खरेदी खतामध्ये खरेदी दस्तामध्ये दहा लोकांची नावे असताना त्यामधील एक नाव वगळून खरेदी खतामध्ये नसलेली पाच नावे त्यामध्ये जाणीवपूर्वक टाकुन एकुण चौदा लोकांचे खरेदीखत आहे असे दाखवून सात बारा तयार केला. तसेच शासनाची फसवणूक केल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रशासकीय कार्यालयात केली होती.

तसेच शिरूर तालुक्यातील काही गावातील तलाठ्यांनी स्वतःच्या कार्यालयात खाजगी झिरो तलाठी नेमले असुन तेच सर्वसामान्य लोकांची आर्थिक लूट करत आहेत. तसेच काही तलाठी त्यांच्या हद्दीत गौणखनिज उत्खनन आणि वाहतुक सुरु असतानाही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल त्यांनी बुडविलेला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी करून याकामी शासनाचे लक्ष वेधले होते.

त्याच तक्रारीची दखल घेऊन पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक करून दप्तर तपासणीचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने दप्तर तपासणी केल्यानंतर अशोक भोरडे यांनी केलेल्या तक्रारी व आरोपामध्ये तथ्य आढळून आल्याचे पुणे उपजिल्हाधिकारी (कुळकायदा) यांनी भोरडे यांना आपण केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याचे लेखी पत्राद्वारे कळवले आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयातील महसूल विभागाकडे पाठविला आहे. व जिल्हाधिकारी महसूल विभागाने तो अहवाल संबंधित तलाठ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उपविभाग पुणे यांच्याकडे संबंधित तपासणी अहवाल तसेच कारवाई करण्याच्या सुचना पुणे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी पुणे यांना दिलेल्या आहेत.

 आता उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे (देवकाते) या शिरूर तालुक्यातील संबंधित तलाठ्यांच्या विरोधात कोणती व कशी कारवाई करणार ..... किंवा त्यांना अभय देणार याकडे संपूर्ण शिरूर तालुक्यातील जनतेसह पुणे जिल्ह्यातील महसूल विभागाचे लक्ष लागले असुन शिरुर तालुक्यातील कोणते मासे आता महसूल विभागाच्या गळाला लागणार हे येत्या काही दिवसातच कळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या