नवीदिल्ली :
कांग्रेस नेते कमल नाथ आणि माजी खासदार संजय गांधी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या दोघांनी दहशतवादी नेता जरनेल सिंग भिंद्रनवाले याला पैसे दिले होते, असा दावा रॉ संस्थेच्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे.
जी.बी.एस. सिद्धू हे देशाची गुप्तचर संस्था 'रॉ'चे माजी रिसर्च अँड अॅनालिसीस विंगचे माजी विशेष सचिव आहेत. त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे, असं जास्तीत जास्त लोकांना वाटावं या उद्देशाने भिंद्रनवालेचा वापर करुन घेण्यात आला, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले सिद्धू?
"त्या काळी वेगळ्या खलिस्तानचा मुद्दा अस्तित्वात नव्हता. मात्र काँग्रेसने भिंद्रनवालेच्या मदतीने या संकल्पनेला खतपाणी घातलं. मी त्या वेळी कॅनडामध्ये होतो, तेव्हाही लोक चर्चा करत होते की काँग्रेस भिंद्रनवाले सोबत एवढी जवळीक का ठेवत आहे.." असं सिद्धू म्हणाले.
काँग्रेसने दिले पैसे
ते पुढे सांगतात, "कमलनाथ म्हणाले, की आम्हाला एक हाय-प्रोफाईल संताला भरती करायचं आहे, जो आमच्या बाजूने काम करेल.. ते (कमलनाथ) असंही म्हणाले की आम्ही त्याला पैसे पाठवत होतो. कमलनाथ आणि संजय गांधी या दोघांनीही भिंद्रनवाले याला पैसे पाठवले."
भिंद्रनवालेने नाही मागितलं खलिस्तान
"भिंद्रनवाले याने कधीही खलिस्तानाची मागणी केली नव्हती. तो केवळ एवढंच म्हणायचा, की जर इंदिरा गांधी यांनी वेगळं खलिस्तान दिलं तर मी नाही म्हणणार नाही. त्याने कधीही धार्मिक उपदेशही दिले नाहीत. त्याचा वापर राजकीय उद्देशांसाठी करण्यात आला." असंही सिद्धू म्हणाले.
कोण होता भिंद्रनवाले
भिंद्रनवाले हा शीख धार्मिक संप्रदाय दमदमी टकसालचा प्रमुख होता. त्याने खलिस्तानची मागणी करत पवित्र सुवर्णमंदिर आपल्या ताब्यात घेतलं होतं. 1 जून ते 8 जून 1984 या दरम्यान भारतीय सैन्याने 'ऑपरेशन ब्लू स्टार' राबवत त्याचा आणि सहकारी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
0 टिप्पण्या