श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील बहुचर्चित संतोष पवार खून प्रकरणी मुख्य आरोपी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपान राऊत यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. राऊत यांचे वकील ॲड. तुषार चौदंते यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर यादव यांनी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर काही अटींच्या अधीन जमीन मंजूर केला आहे.
5 एप्रिल 2023 रोजी निपाणी वडगाव येथील संतोष पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना श्रीरामपूर पोलीस स्टेशनला फोन आला. पवार यांचा मृत्यू संशयास्पद असून खून झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांच्या पथकाने तात्काळ निपाणी वडगाव येथे पोहोचून पवार यांचा अंत्यविधी थांबवला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चौकशीअंती या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात पवार याची पत्नी सविता, अजय गायकवाड, प्रसाद भवार आणि सोपान राऊत यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. अटक होण्यापूर्वी राऊत यांनी जामीनासाठी प्रयत्न केला मात्र त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अटक केल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याने नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
त्यानंतर ॲड. तुषार चौदंते यांनी राऊत यांच्या वतीने जामीन अर्ज न्यायालय पुढे सादर केला. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्याच्या प्रतीक्षात आहे. त्यामुळे राऊत यांच्या कौटुंबिक जबाबदारी आणि शारीरिक क्षमतेचा विचार करून त्यांचा जामीन मंजूर करावा, अशी मांडणी ॲड. चौदंते यांनी केली. शिवाय
सोपान राऊत हे ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, पंचवीस वर्षांपासून अशोक कारखान्याचे संचालक, याच कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता विरोधकांनी त्यांना बदनाम करण्यासाठी या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला असू शकतो. त्यांच्याविरुद्ध कुठलेही ठोस पुरावे पोलिसांकडे नाहीत. इतर आरोपींच्या व साक्षीदारांच्या जबाबामध्ये भिन्नता असल्याचे ॲड. चौदंते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. प्रसन्न गटने यांनी बाजू मांडली. सोपान राऊत यांना जामीन देऊ नये. ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. पोलिसांकडे त्यांच्याविरुद्ध ठोस पुरावे आहेत. शिवाय घटना घडली त्या चार दिवसात आरोपी सविता व राऊत यांच्यात तब्बल 151 फोन कॉल झाले आहेत. त्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. खुनाचा कट रचण्यात राऊत यांचा सहभाग आहे. त्यामुळे जामीन नाकारावा, अशी मागणी गटने यांनी न्यायालयाकडे केली.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश यादव यांनी 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर राऊत यांचा जामीन मंजूर केला. पोलिसांचा तपास पूर्ण झाला असल्याने राऊत तपासात अडथळा आणण्याची शक्यता नाही. शिवाय राऊत आजारी असून त्यांच्या वयाचा आणि सद्यस्थितीत असलेल्या शारीरिक व्याधींचा विचार करून त्यांना जमीन मंजूर करत असल्याचे न्यायाधीश यादव यांनी म्हटले आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत राहू त्यांना श्रीरामपूर न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाता येणार नाही. तसेच पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे निकालात म्हटले आहे.
_________
0 टिप्पण्या