मुलगा बऱ्याच दिवसापासून दारू पिऊन त्रास देत असल्याने जन्मदात्या आईनेच तरुण मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली.
बार्शीटाकळी ते अकोला मार्गावरील आळंदा फाट्यानजीक बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले असून सदर तरुणाची जन्मदात्या आईनेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या गुन्ह्यात मृतकाच्या आईला मदत करणारा आरोपी अद्यापही फरार आहे.
शुक्रवारी (८ सप्टेंबर) रोजी अंदाजे २२-२४ वर्षे वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतहेद बांधलेल्या अवस्थेत आळंदा फाट्यासमोर आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे व त्यांच्या पथकाने त्वरीत घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे नाव शांताराम रमेश नागे असून तो आळंदा येथील शिवसेना झोपडपट्टीत गत दहा ते बारा वर्षांपासून राहत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी अधिक तपास केला असता मयत शांताराम हा अविवाहीत व व्यासनाधीन होता व घरी नेहमी त्याच्या आईला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा, अशी माहिती समोर आली.
शांतारामच्या वागण्याने त्याची आई त्रस्त झाली होती. ७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री शांताराम झोपेत असताना जन्मदात्या आईनेच त्याच्या डोक्यावर दगडी पाटा मारला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर दिवस उजाडायच्या अगोदरच आईने एका परिचिताच्या मदतीने शांतारामचे प्रेत घरातील गोधडीत बांधले व मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता रात्रीच दुचाकीने बार्शीटाकळी-अकोला मार्गाने निघाले. परंतु, दुचाकीतील पेट्रोल संपल्याने सोबतचा परिचित व्यक्ती मृतदेह तिथेच रस्त्याच्या कडेला ठेवून पेट्रोल आणण्याच्या बहाण्याने तेथून फरार झाला. त्याची वाट पाहून शांतारामची आईसुद्धा प्रेत तेथेच ठेवून घरी परतली.
सकाळी रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबड उडाली होती. मात्र, बार्शीटाकळी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात गुन्ह्याचा छडा लावला. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे, प्रवीण जाधव करीत आहेत.
आळंदा येथील हत्या प्रकरणात एकूण दोन आरोपी असून, एका आरोपीस अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपीला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
- शिरीष खंडारे, पोलिस निरीक्षक, बार्शीटाकळी
0 टिप्पण्या