समीर वानखेडे आणि इतर चौघांनी २०२१ मध्ये कॉर्डेलिया क्रूझमधून आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणात आर्यनची निर्दोष सुटका करण्यासाठी शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप त्यांच्यावर होता. वानखेडेंसह इतर चार जणांविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हेगारी कट आणि खंडणीच्या धमक्यांच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजेच ‘कॅट’ने निर्णय दिला आहे. या प्रकरणात समीर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह हे समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीचा भाग नव्हते. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात समीर यांनी जी कारवाई आणि तपास केला, त्याची सर्व माहिती सिंह यांना होती, असं म्हणता येणार नाही. समीर यांच्यावरील आरोप खोटे असून ते निर्दोष असल्याचा निर्णय ‘कॅट’ने दिला आहे.
समितीचा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा होता आणि वानखेडेवर कारवाई करण्याबाबत केंद्र सरकार आणि एनसीबी स्वतंत्र निर्णय घेईल, असा युक्तिवाद एनसीबीने केला असून त्याची ‘कॅट’ने दखल घेतली आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील तपास समितीच्या निष्कर्षांनुसार सीबीआयने दाखल केलेला खंडणी आणि लाचखोरीचा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका वानखेडेंनी दाखल केली होती. त्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या