आशियाई टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजाची सुवर्ण कामगिरी

 



नवी दिल्ली :   

ऋतुजा भोसले हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिसमधील मिश्र दुहेरी गटामध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. महाराष्ट्राच्या ऋतुजा भोसलेने इतिहास रचला आहे. ऋतुजाला यावेळी रोहन बोपण्णाने सुरेख साथ दिली आणि त्यामुळेच भारताला हे सुवर्णपदक जिंकता आले आहे.

चीनमधील हँगझोऊ येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या जोडीने मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. 


पहिल्या सेटमध्ये भारताच्या ऋतुजाआणि रोहन यांना पराभव पत्करावा लागला होता. पण या दोघांनी हार मानली नाही. या दोघांनी दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले आणि हा सेट ६-३ असा जिंकला. त्यांनतर तिसरा सेट हा निर्णायक होता. पण दुसऱ्या सेटनंतर ऋतुजा आणि रोहन यांच्या खेळात चांगली आक्रमकता आली होती. 


या गोष्टीचा फायदा त्यांना तिसऱ्या सेटमध्ये झाला. ऋतुजा आणि रोहन यांनी तिसरा सेट १०-४ असा जिंकत सुवर्णपदक पटकावले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या