बहुउद्देशीय शिक्षक भवनाचा लोकार्पण सोहळा संपन्न
श्रीरामपूर : माझे राजकीय गुरु हशु आडवाणी नेहमी म्हणायचे कि निवडणूक होईपर्यंत उमेदवार हा एका पक्षाचा असतो. परंतु निवडून आल्यानंतर तो मतदार संघातील सर्वांचा असतो.मी तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झालो. राखीव मतदार संघाला फार मालक असतात. जनरलला मात्र एकच असतो.आपला हा परिसर साखर सम्राटांचा भाग आहे. इथे सांगता येत नाही व बोलता ही येत नाही अशी अवस्था आहे. त्यांच्या या साम्राज्यात त्यांच्या सहकार्यानेच एन्ट्री करावी लागते.चांगले काम करणाऱ्यांना आपण नेहमी मदत करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यशापयशाची कधी भीती मला वाटली नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून सध्या दर्जेदार शिक्षण मिळत आहे.त्यामुळे खाजगी शाळेतील विद्यार्थी आता जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळत आहेत. यासाठी सर्व गुरुजनांना धन्यवाद दिले पाहिजे. शाळांना खोल्या आणि संगणकाच्या रूपाने मदत करणारा मी पहिला खासदार होतो असे प्रतिपादन शिर्डी मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी केले.
श्रीरामपूर तालुका व नगरपालिका पेन्शनर शिक्षक संघटनेच्या शिक्षक भवनाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष द मा ठुबे गुरुजी होते. यावेळी भाजप नेते प्रकाश चित्ते, बबनराव मुठे,शिवसेनेचे राजेंद्र देवकर,प्रशांत लोखंडे, नगरसेवक रवी पाटील, राजेंद्र चव्हाण,वैशाली चव्हाण,पेन्शनर संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ब द उबाळे, ज प काळे गुरुजी,
शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण,नगरपालिका संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे, शहराध्यक्ष प्रकाश माने आदि उपस्थित होते.
खासदार निधीतून दहा लाख रुपये खासदार लोखंडे यांनी या शिक्षक भवनासाठी उपलब्ध करून दिले.त्यामुळे ही इमारत उभी राहू शकली. इमारतीचे उर्वरित काम अद्याप बाकी असून त्यासाठी देखील खासदारांनी मदत करावी अशी मागणी यावेळी अशोक बागुल यांनी केली.
शिक्षक नेते सलीमखान पठाण यांनी खासदार लोखंडे साहेब यांच्या प्रयत्नातून शिर्डी मतदारसंघातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या १२५ वर्गांना इंटर ऍक्टिव्ह बोर्ड मिळाले आहेत. संपूर्ण मतदारसंघातील या शाळांमधून गोरगरीब मुले आज दर्जेदार शिक्षण घेत आहेत.नगर विकास विभागाकडून हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सदाशिव लोखंडे यांना निश्चित धन्यवाद दिले पाहिजे असे सांगितले.
पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष द मा ठुबे यांनी पेन्शनरांचे विविध प्रश्न खासदारांपुढे मांडून या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांची भेट घालून द्यावी अशी मागणी केली.
या प्रसंगी पेन्शनर संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ब द उबाळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बागुल यांनी केले तर आभार तालुका संघाचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी मानले.
कार्यक्रमास सर्वश्री चव्हाण गुरुजी, खपके गुरुजी, ल बा कोल्हे, के टी निंभोरे, कवितके, लतीफ शेख, शब्बीर शेख, प्रकाश माने, अशोक गायकवाड, सुरेश कांबळे, अरुण ठाकरे, किशोर निळे, दिलीप फुलवर, बापू टाक, प्रताप शिंदे, मंशाराम सुतार, रोकडे, चंद्रकांत हरके, किशोर आढाव, बापू लांडे, शरद ससाणे, भागाजी ठाणगे, पारधे मॅडम, चित्ते मॅडम, शिंदे मॅडम, बनकर मॅडम,आदींसह तालुक्यातील व नगरपालिकेतील पेन्शनर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदारांनी घेतला वडापावचा आस्वाद
कार्यक्रमास खूप उशीर झाला होता.त्यामुळे कार्यक्रमानंतर उपस्थितांच्या नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.त्यावेळी प्रताप देवरे व अशोक बागुल यांनी खासदार लोखंडे यांना वडापाव खाण्याचा आग्रह धरला. त्यांनी तो आग्रह मान्य करीत वडापावचा आस्वाद घेतला.
0 टिप्पण्या