Breaking News : कोपर्डीचा बलात्कारी जितेंद्र शिंदेने केली येरवडा कारागृहात आत्महत्या..!

 

फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची राज्यात पहिलीच आत्महत्या 



पुणे : अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याने कारागृहात आत्महत्या केल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. 

कोपर्डी बलात्कार आणि खूनखू प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवुन सोडले होते. त्यानंतर ऐतिहासिक मराठा मोर्चाला प्रारंभ झाला. 
१३ जुलै २०१६ च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासाठी विशेष फास्ट ट्रक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेसह तीनही आरोपींना २९ नोव्हेंबर २०१७ ला नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. 
 यातील आरोपींना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताताना आरोपींना पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. 
दरम्यान, आज रविवारी पहाटेच्या सुमारास येरवडा कारागृहातील बराकमध्ये मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. 
दरम्यान, आरोपी संतोष भवाळ याने या शिक्षेला मुंबईत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हाने दिले. तर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकारच्यावतीनेही उच्च न्यायालयात प्रकरण नेण्यात आले आहे. आरोपी भवाळ याने मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करून हे संपूर्ण प्रकरण औरंगाबादहून मुंबईला वर्ग करण्याची विनंती केली होती. त्यानुसार हे प्रकरण मुंबईला वर्ग झाले. तेथेही सादर प्रकरणाच्या अंतिम युक्तिवादाची सुनावणी त्यांच्यासमोर चालविण्यासाठी न्यायमूर्ती साधना जाधव यांनी नकार दिला होता.सध्या खटल्याची सुनावणी प्रलंबित आहे. या काळात तिन्ही आरोपींनी येरवडा कारागृहात ठेवण्यात आले.
आता पुन्हा मराठा आंदोलनाने पेट घेतलेला असताना समाजाच्या कोपर्डीच्या आठवणी या घटनेच्या निमित्ताने ताज्या झाल्या. आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी कोपर्डीत वेळोवेळी आंदोलने झाली. आता जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना कोपर्डीतूनही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामध्येही या आरोपींनी तातडीने फाशी द्यावी, ही मागणी करण्यात आली. काल सायंकाळीच प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे चक्री उपोषण मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर आज सकाळी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुख्या आरोपीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र यावरून आता जेलप्रशासनाला धारेवर धरले जात असून या विषयावरूनही आंदोलने होण्याची शक्यता आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्याने कडेकोट बंदोबस्त असलेल्या येरवडा कारागृहात आत्महत्या कशी केली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या