'ते' आरोपी निर्दोष मग दोषी कोण ? निठारी हत्याकांडातील नरभक्षी निर्दोष

              





२००६ साली संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटना घडली. उत्तर प्रदेशमधील निठारी या गावात एका कोठी लगतच्या नाल्यात अनेक सांगाडे सापडले होते त्यात बरेच सांगाडे हे लहान मुलांचे होते. 


या हत्या कांडाचे केवळ उत्तर प्रदेश मध्येच नव्हे तर संपूर्ण देशात पडसाद उलटले होते. या हत्याकांडाचा तपास होऊन दोषींना शिक्षा व्हावी यासाठी या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने सखोल तपास करून मनिंदर सिंग पंधेर व सुरेंद्र कोली या दोन व्यक्तींना अटक केली. हे दोघेही विकृत मनोवृत्तीचे असून त्यांनी सुमारे बारापेक्षा अधिक मुलांची हत्या केली आणि त्यांचे मांस शिजवून खाल्ले आणि सांगाडे नाल्यात फेकले असा दावा करत सीबीआयने त्या दोघांची तुरुंगात रवानगी केली. 


२० डिसेंबर २००६ रोजी मनींदर सिंग पंधेर याच्या बंगल्या शेजारील नाल्यात आठ मुलांचे सांगाडे सापडले. त्यानंतर आणखी काही सांगाडे आणि कवट्या त्या नाल्यात आढळून आल्या. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्या परिसरातील अनेक मजुरांची मुले बेपत्ता असल्याची बाब समोर आली. यात  मुलींचाही समावेश होता. पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुला मुलींच्या पालकांची आणि सांगाड्यांची  डी एन ए चाचणी केल्यानंतर हे सांगाडे बेपत्ता झालेल्या मुला मुलींचेच असल्याचे सिद्ध झाले.


 पोलिसांनी संशयावरून मानिंदर सिंग पंधेर आणि सुरेंद्र कोली यांना अटक केली त्यांची चौकशी केली असता त्यांनी  आपणच या मुलांचे अपहरण करून त्यांना ठार मारले आणि त्यांचे मांस भक्षण करून त्यांचे सांगाडे नाल्यात फेकून दिल्याचे कबूल केले.  या दोघांच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावे असून त्या पुराव्याच्या आधारे या दोघांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सीबीआने न्यायालयात  केली. आरोपींचा कबुली जबाब आणि पुराव्यांच्या आधारे स्थानिक न्यायालयाने या दोघांनाही २००९ साली फाशीची शिक्षा सुनावली मात्र या शिक्षेच्या विरोधात त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली तिथे मात्र त्यांनी कबुली जबाब नाकारला व आमच्याकडुन तो जबरदस्तीने लिहून घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सीबीआयने  स्थानिक न्यायालयात सादर केलेले पुरावे उच्च न्यायालयाने ग्राह्य धरले नाही. 


पोलिसांनी सादर केलेले पुरावे आरोपींना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत असे म्हणत माननीय उच्च न्यायलयाने आता या दोघांचीही निर्दोष मुक्तता केली. आता प्रश्न पडतो तो असा की जर या दोघांनी हे हत्याकांड केले नसेल तर मग कोणी केले? जे पोलीस आणि सीबीआय आरोपींना स्थानिक न्यायालयात दोषी ठरवू शकले तेच पोलीस आणि सीबीआय उच्च न्यायालयात आरोपींना दोषी ठरवण्यात अपयशी कसे ठरले? आरोपींना दोषी सिद्ध करण्याइतपत पोलिसांकडे पुरावे नसतील तर ते पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल. 


सीबीआय सारख्या प्रतिष्ठित तपास यंत्रणेवर देखील यामुळे  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण हे पहिल्यांदाच घडले आहे असे नाही सीबीआयने तपास केलेल्या अनेक प्रकरणात हेच घडले आहे . २००६ सालीच दिल्लीमध्ये आरुषी तलवार हत्याकांड घडले होते. दिल्लीतील १४ वर्षाच्या आरुषी तलवार आणि तिच्या घरातील नोकर असलेल्या हेमराज यांची हत्या आरुषीच्याच आई वडिलांनी केली असा आरोपी सीबीआयने केला. चार वर्षाची हवा खाल्ल्यावर न्यायालयाने आरुषीच्या आई वडिलांना  दोषमुक्त केले.  


जेसिका लाल हत्याकांड हे ही असेच देशात गाजलेले मोठे हत्याकांड. जेसिका लाल नामक हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवतीची मनू शर्मा नामक युवकाने हत्या केली. मनू शर्माला स्थानिक न्यायालयात जनमठेपेची शिक्षा देण्यात आली मात्र उच्च न्यायालयात तो ही निर्दोष सुटला. निठारी हत्याकांडातील आरोपी असोत की आरुषी तलवार हत्याकांडातील की जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी असो या हत्याकांडातील आरोपींना खालच्या न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली मात्र उच्च न्यायालयात ते निर्दोष मुक्त झाले. या आरोपींना उच्च न्यायालयात दोषी सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी का ठरत आहे हे एक न उलगडणारे कोडे आहे. सीबीआय सारख्या प्रतिष्ठित तपास यंत्रणेच्या  विश्वासार्हतेवर  देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


संकलन

श्याम ठाणेदार.       


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या