पालकमंत्री नियुक्तीत अजितदादागिरी... मुख्यमंत्री शिंदे गटाला दाखविला कात्रजचा घाट


पुण्यावर ताबा; राष्ट्रवादीला सात पालकमंत्रीपदे



मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना बुधवारी राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देत चंद्रकांत पाटील यांना सोलापूर, अमरावती जिल्ह्याची तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना अहमदनगरसह अकोला जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपदे देण्यात आली. 


 राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवला असल्याची चर्चा रंगली आहे.


पालकमंत्री पदासाठी काही आमदार उत्सुक होते. मात्र, त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले इच्छुक आहेत. भरत गोगावले यांचा अद्याप मंत्री म्हणून शपथविधीदेखील झाला नाही. तर, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ उत्सुक होते. मात्र, त्या ठिकाणी कोणताही बदल तूर्तास करण्यात आला नाही. काही मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्याची जबाबदारी आहे. नंदुरबारमध्ये गेल्या दोन पंचवार्षिक भाजपचा पालकमंत्री असताना आता राष्ट्रवादीचा शिलेदार जबाबदारी सांभाळणार आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ही काही जिल्ह्यांचा भार कमी करण्यात आला आहे.

________


12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नवी यादी

पुणे : अजित पवार

अकोला : राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर, अमरावती : चंद्रकांत पाटील

भंडारा : विजयकुमार गावित

बुलढाणा : दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर : हसन मुश्रीफ

गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम

बीड : धनंजय मुंडे

परभणी : संजय बनसोडे

नंदूरबार : अनिल भा. पाटील

वर्धा : सुधीर मुनगंटीवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या