जर्मनीच्या व्हिसासाठी आवश्यक APS प्रक्रिया सुरळीत करा!

- लाखो विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया टांगणीवर 
- APS प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागताहेत ४ ते ६ महिने 
- आ. सत्यजीत तांबे यांचं जर्मनीच्या वाणिज्य दुतावासाला पत्र 




श्रीरामपूर :

जर्मनीत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक अशा शैक्षणिक अभ्यासक्रम मूल्यमापन प्रमाणपत्र (APS) मिळवण्यासाठी सध्या चार ते सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया आणि व्हिसा प्रक्रिया टांगणीवर लागली आहे. परिणामी कर्ज काढून शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ताणतणावाचा सामना करावा लागत असून काहींच्या अभ्यासक्रमातील पहिलं सत्र चुकत आहे. या बाबीकडे आता आमदार सत्यजीत तांबे यांनी लक्ष वेधलं असून जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्य दुतावासाचे प्रमुख अखीम फॅबिग (Achim Fabig) यांना पत्र पाठवून हे APS प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरळीत करण्याची विनंती केली आहे. 

 

उच्च शिक्षणासाठी देशाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून जर्मनीतील विविध विद्यापीठांनाही भारतीय विद्यार्थ्यांची पसंती असते. या देशातील सरकारी विद्यापीठांमध्ये फी खूप कमी असल्याने आणि शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याने भारतीय विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी जर्मनीत जात आहेत. मात्र ऑक्टोबर २०२२ पासून जर्मन दुतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा प्रक्रियेसाठी शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन करणारं APS प्रमाणपत्र मिळवणं अनिवार्य केलं आहे. हे प्रमाणपत्र जर्मनीच्या दुतावासाकडून दिलं जातं. सुरुवातीला ही प्रक्रिया चार ते सहा आठवड्यांची असेल, असं सांगण्यात आलं होतं. तसंच या प्रमाणपत्राचा क्रमांक विद्यार्थ्यांकडे असल्याशिवाय त्यांना व्हिसासाठी अर्ज दाखल करता येणं शक्य नव्हतं. 

 

या नियमामुळे गेल्या वर्षापासून हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणि व्हिसा प्रक्रिया लटकली आहे. दुतावासाने चार ते सहा आठवडे सांगूनही सुरुवातीपासूनच हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत आहे. आता तर हा कालावधी सहा महिन्यांच्या आसपास पोहोचला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचं आ. सत्यजीत तांबे यांनी जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्य दुतावासाचे प्रमुख अखीम फॅबिग यांच्या निदर्शनास आणून दिलं. दुतावासामार्फत ही प्रक्रिया सुरळीत करून चार ते सहा आठवड्यांच्या नियोजित काळातच ही प्रमाणपत्रं विद्यार्थ्यांना मिळावी, अशी विनंती आ. तांबे यांनी केली. 

 

हा हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न 

परदेशात शिकायला जाणारे विद्यार्थी बहुतेक वेळा कर्ज काढून जातात. फक्त फी नाही, तर व्हिसा, परदेशात पहिले काही महिने खर्च करण्यासाठीचे पैसे, तिकिटाचे पैसे असे अनेक खर्च त्यांच्यासमोर असतात. त्यात या APS प्रमाणपत्र मिळवण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त मानसिक ताण पडत आहे. अनेकांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, पण हे प्रमाणपत्र नसल्याने व्हिसासाठी अर्ज दाखल करता येत नाही आणि व्हिसा नसल्याने जर्मनीत जाऊन अभ्यासक्रम सुरू करता येत नाही, अशी कोंडी झाली आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, यासाठी मी प्रयत्न करेन. – आ. सत्यजीत तांबे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या