महामार्गालगत ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी होणार..?

 


अजून किती अपघाती मृत्यू बघायचे?
डोळासणे व वावी ट्रॉमा केअर सेंटरबाबत आ. सत्यजित तांबे आक्रमक 
- चर्चासत्र घेत योग्य ते निर्णय घेऊन ट्रॉमा केअर सेंटर सुरू : तानाजी सावंतप्रतिनिधी l राष्ट्र सह्याद्री 

नागपूर : 


नागरिक आणि उद्योग या दोहोंसाठी दळवळणाच्या उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी राज्यात महामार्गांचं विस्तीर्ण जाळं तयार केलं जात आहे. मात्र, महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी होणार, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात उपस्थित केला. अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी अशा ट्रॉमा केअर सेंटर्सची निकडीची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पायवारी करणाऱ्या चार वारकऱ्यांना एका गाडीने चिरडल्याची घटना घडली होती. हे वारकरी जखमी अवस्थेत असताना त्यांना तातडीने उपाययोजना न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. महामार्गांलगत ट्रॉमा केअर सेंटर असतं, तर त्यांचे जीव वाचले असते, अशी खंत उपस्थित करत आ. सत्यजीत तांबे यांनी या मागणीचं गांभीर्य विशद केलं. पावसाळी अधिवेशादरम्यान पुरवणी मागणीच्या माध्यमातून अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील ट्रॉमा केअर सेंटरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर संबंधित खात्यांसोबत पत्रव्यवहारही केला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस पावलं याबाबत उचलली गेली नाहीत, असं आ. तांबे म्हणाले.

राज्याचे आरोग्य सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी उत्तर देताना सांगितले की, संबंधित ट्रामा केअर सेंटरची माहिती घेऊन, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर चर्चासत्र घेत योग्य ते निर्णय घेऊन ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले.


आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी लावली तातडीची बैठक

डोळासणे व वावी ट्रॉमा केअर सेंटर संदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटरचा प्रश्न मार्गी लागला असून आमदार सत्यजित तांबे यांचा प्रयत्नांना यश मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या