वडगाव गुप्ता येथील जमीन एमआयडीसीला मिळणार..!

 शासकीय जमिन एमआयडीसीकडे वर्ग करण्यास मंत्री मंडळाची मान्यता 

 खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश 




नगर :
तरूणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. 

नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहती करिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्री मंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता. 

काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील ६०० एकर म्हणजेच सुमारे २२५ हेक्टर आर जमीन फेज २ साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुजय विखेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या