Editorial : लग्नकार्याचा अर्थव्यवस्थेला हातभार

 


कोरोनानंतरची तीन-चार वर्ष अर्थव्यवस्था डबघाईला गेली. अशाही परिस्थितीत भारतीय लग्न संस्कृतीने अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात तारण्याचा प्रयत्न केला. वाढपी, मंडपवाल्यापासून, बँडबाजा, हनिमून पॅकेज देणार्‍या ट्रॅव्हल्स कंपन्या. विवाहाच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रांत पैसा फिरतो. या मंगल कार्यासाठी मोठा खर्च केला जातो. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला एकप्रकारे बळ मिळते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


'कन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'नुसार देशात गेल्या नोव्हेंबरपासून पुढील चार महिन्यांत देशभरात सुमारे 38 लाखांहून अधिक विवाह सोहळ्यांचे आयोजन होणार आहे. या चार महिन्यांत सुमारे 4.75 लाख कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी याच कालावधीत 35 लाखांपेक्षा अधिक विवाहांवर 3.75 लाख कोटी रुपयांची रक्कम खर्च झाली होती. विवाहाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांवर होणार्‍या खर्चाचे आकलन केल्यास यावर्षी नवीन कपडे, नवे दागिने खरेदी करण्याच्या आधारावर एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाहुण्यांवर होणार्‍या खर्चापोटी 60 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च होत आहे. तसेच विवाह सोहळ्याशी संबंधित कार्यक्रमांवरही एवढाच खर्च होत आहे.जगातील कोणताही देश विवाह सोहळ्यावर एवढा खर्च करत नाही. आज तर विवाह न करता 'लिव्ह इन रिलेशन' नावाची पद्धत रूढ झाली आहे.

विकसित देशांत प्रचलित असलेला हा पायंडा आपल्यकडेही पडत असून काही जण मुलेही जन्माला घालत नसताना दिसून येत आहे. काही काळातच त्यांचा घटस्फोट झाल्याचे समजते. यादरम्यान एखाद्या जोडप्याला बाळ झाले तर सिंगल पेरेंटच्या पद्धतीच्या अधिकाराचा वापर केला जातो. यानुसार बाळाला आईकडे राहण्याचा अधिकार असतो. याच कारणांमुळे जगातील अनेक देशांत ज्येष्ठांची संख्या वाढत आहे आणि त्याचा थेट प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. एकुणातच विवाह हा वैदिक संस्कृतीचा संस्कार असून, ते भारतात कुटुंब व्यवस्था टिकवून ठेवण्यास मदत करत आहेत; अन्यथा विकसित देशांत संयुक्त कुटुंब पद्धत ती असून नसल्यासारखीच आहे. शेवटी ज्येष्ठांचा सांभाळ या देशांत सरकारच्या एका सामाजिक लाभ योजनेनुसार करावा लागतो. त्यावरचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि या देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडत आहे. याउलट भारतात विविध सण, विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरे केले जातात. या आधारावर यंदाच्या दिवाळीला आणि धनत्रयोदशीला 3.75 लाख कोटींची उलाढाल झाली. केवळ करवा चौथच्या दिवशी 15 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.


देशात सणवाराला गेल्या ऑक्टोबर महिन्यांत 23 लाख वाहनांची विक्री झाली. चार लाख चारचाकी वाहने आणि 19 लाख दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. आता लग्नसराईचा काळ सुरू असून, वाहनांचीही जबरदस्त विक्री होण्याची शक्यता आहे. आज भारतात सधन कुटुंबांची आणि नागरिकांची संख्या वाढत आहे. अलीकडच्या काळात पाहुण्यांसह परदेशात विवाह करण्याचे प्रस्थ वाढू लागले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय नागरिकांना परदेशात विवाह न करण्याचे आवाहन करत आहेत.

भारतात पर्यटनस्थळे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असताना तेथे सहजपणे विवाह सोहळे आयोजित करणे शक्य आहे. या विवाहांवर होणार्‍या खर्चाचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला मिळेल. भारतीय नागरिकांडून वैदिक संस्कृतीचे पालन केले जात असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा मिळत असल्याचे दिसून येत आहे. विविध आंतरराष्ट्रीय संस्था या भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढवत आहेत. अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघाने 2024 साठी भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज 6.3 टक्के केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या