अपघात कायद्याविरोधात टँकर चालकांचा संप

 

देशात इंधन टंचाईची शक्यता 



नगर :


सरकारने अपघाताबाबत केलेल्या जाचक  कायद्याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी संप पुकारला आहे. १ जानेवारी ते ३ जानेवारी दरम्यान टँकरचालक संपावर गेले आहेत. या  संपामध्ये नाशिकच्या मनमाड जवळील हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इंधन प्रकल्प व इंडेन गॅस बॉटलींग प्रकल्पातील जवळपास  2 हजार इंधन वाहतूक करणारे टँकर  चालक या संपात सहभागी झाल्याने राज्यात होणारा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रसह इतर 13 जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता आहे. 



या संपामुळे राज्यातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने अपघाताबाबत केलेल्या कायद्यामध्ये दहा वर्षांच्या शिक्षा आणि सात लाख दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. टँकर चालकांनी एकत्र येत सरकारच्या अन्यायकारक अपघात कायद्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निर्दशने केली. शासनाने अन्यायकारक कायदा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.केंद्र सरकारने हा कायदा करू नये; अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे.

 नवीन कायद्याच्या निषेधार्थ टँकर चालकांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपामध्ये इंधन वाहक वाहतूक करणाऱ्या टँकर चालक सहभागी झाल्याने इंधन पुरवठा ठप्प असल्याने राज्यासह नगरजिल्ह्यातील विविध भागात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांनी मोठी गर्दी केली होती. हे चित्र सोमवारी उशिरा पर्यंत पाहायला मिळाले. पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारल्याने पेट्रोल पंप बंद राहण्याच्या भीतीपोटी वाहनधारक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी पंपांवर रांगा लावल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळाले.  या संपामुळे येत्या दोन, तीन दिवसांत पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 



केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर  ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्याविरुद्ध टॅंकर व ट्रकचालकांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात इंधनाचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.


ट्रकचालकांनी ट्रक केले रस्त्यावर उभे...
कायद्याला देशभरातील ट्रकचालकांकडून विरोध होत असल्याचे चित्र आहे. याचे पडसाद हरियाणा, पंजाब सारख्या राज्यात अधिक प्रमाणात उमटताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे विविध राज्यातील ट्रकचालक आपले ट्रक रस्त्यावर उभे करून निघून जात आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या