बस, कार व ट्रकच्या भिषण तिहेरी अपघातात सहा जण जागीच ठार

  



नगर जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा भिषण अपघात झाला.या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी (२३ जानेवारी ) मध्यरात्री 2 : 30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको कार यांच्यात अहमदनगर जिल्ह्यातील ढवळापूर फाट्या नजीक मध्यरात्री अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समोर आली नाही. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या