Crime : कामवालीच निघाली चोरीची सूत्रधार!

 


  • डॉ. ब्रह्मे चोरीचा तपास लावण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश
  • दोघा आरोपींसह 22 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी पसार...

श्रीरामपूर : येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरी झालेल्या 45 लाख रुपयांच्या चोरीचा तपास लावण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे डॉक्टर ब्रह्मे यांच्याकडे काम करणाऱ्या एका महिलेनेच चोरीचे षडयंत्र रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्या महिलेसह कन्नड येथील तिघा आरोपींचा या चोरीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. अटक केलेल्या दोघा आरोपींकडून 22 लाखांचा मुद्देमाल ही हस्तगत करण्यात आला आहे. 

जाबीर रशीद शेख (राहणार कन्नड) व हिना राजू सय्यद (राहणार श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर दोघे कन्नड येथील आरोपी पसार झाले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी 30 ऑक्टोबर 2023 रोजी महिन्यांपूर्वी श्रीरामपूर शहरातील काळाराम मंदिराशेजारी राहणारे डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती. घरातील तब्बल 40 लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. फिर्यादीत एक सात लाख रुपये किमतीचा सोन्याचा हारही चोरीस गेल्याची नोंद आहे. इतकी मोठी रक्कम चोरीला गेल्यामुळे त्याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र सीसीटीव्ही फुटेज वरूनही फारसे काही हाती लागले नाही. त्यामुळे बराच काळ हा तपास रेंडाळला होता. 

पोलिसांनी मात्र हार मानली नाही. ज्या पद्धतीने चोरी झाली त्यानुसार कोणीतरी माहितगार माणसाने टीप दिल्याशिवाय ही चोरी झाली नसावी असा संशय शहर पोलिसांना आला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळी पथके त्या दृष्टीने तपास करत होती. अखेर या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांच्यासह दोन गुन्हे शोध पथकांनी हा तपास लावला.

एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील दोघे श्रीरामपूर येथील आहेत. डॉक्टर ब्रह्मे यांच्याच घरी काम करणारी महिला हिना आणि तिचा भाऊ या चोरीच्या कटात सहभागी असल्याचे समजते. पसार झालेले इतर दोघे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती लवकरच जाहीर करतील. 


चोरीचा घटनाक्रम...

 शहरातील कॅनॉलच्या कडेला काळाराम मंदिर शेजारी ब्रह्मे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरती डॉ. प्रफुल्ल यांचे घर आहे. चोरी झाली तेव्हा डॉक्टरांच्या पत्नी आणि मुलगी या कर्नाटक परिसरातील धारवाड येथे माहेरी गेलेल्या होत्या. तसेच त्यांचा मुलगा चिन्मय हा देखील कॉन्फरन्ससाठी बाहेरगावी गेलेला होता. 30 ऑक्टोबरला पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा चिन्मय हा बाहेरगावाहून आला. चिन्मय हेही डोळ्याचे डॉक्टर असून ते नगर येथील कांकरिया हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात. पहाटे आल्यानंतर ते झोपी गेले. साधारण साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान तीन चोरट्यांनी लोखंडी शिडी डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या पुढच्या बाजूला लावली. वर चढताना अगोदर हॉस्पिटलच्या दरवाजालाही बाहेरून कडी लावली. शिडीवरून तिघे चोर वर गेले.

त्यानंतर कटरच्या साह्याने त्यांनी जाळी तोडून घराचा कडी कोयंडा तोडला आणि आत प्रवेश केला. अगोदर चोरट्यांनी डॉ. चिन्मय ब्रम्हे यांच्या रुमचा दरवाजा बाहेरुन बंद केला. आणि हे तिघे चोर डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे झोपलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी डॉ. प्रफुल्ल ब्रह्मे यांचे तोंड हाताने दाबले. दोन जणांनी लगेच त्यांचे हातपाय बांधले. त्यामुळे डॉ. ब्रह्मे हे गप्प बसले. हातपाय बांधून खिडकीला डॉक्टरांचे पाय वर लटकवले. नंतर चोरटे थेट ज्या कपाटात कॅश ठेवली, त्या कपाटाजवळ गेले. त्यांनी कटवणीच्या साह्याने ते उघडले. आणि कपाटातील कॅश एका बॅगेत भरली. साधारण वीस मिनिटांच्या आत हा सगळा प्रकार झाला. कॅश घेऊन तिघे चोरटे आल्या मार्गे पसार झाले. चोरटे गेल्यानंतर डॉक्टरांनी कशीबशी आपली सुटका करत, आपल्या मित्रांना फोन लावला. चोरटे गेल्यानंतर त्यांनी कपाटातील कॅश तपासली असता 100, 200 व 500 रुपयाच्या नोटा मिळून अशी एकूण 40 लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या