दिनविशेष लेख : पर्यावरण संतुलनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन आवश्यक



आज (दिनांक 02 फेब्रुवारी) हा जागतिक पाणथळ दिन. पर्यावरणासाठी, त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्व मोठे आहे. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन अनेक पावले उचलत आहेत. त्यामुळे या जागांचे पर्यावरणीय स्वरूप जतन केले जात आहे. राज्यातील अनेक जागा या रामसर परिषदेच्या निकषांनुसार पात्र ठरतात. अर्थात, अशा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार रामसर स्थळ म्हणून घोषित होणं पुरेसं नाही. त्यानंतर त्या वारसा स्थळांचा दर्जा टिकवून ठेवणे, त्यांचे संवर्धन करणे अधिक महत्वाचे आहे. रामसर स्थळांच्या जतन आणि संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही  तर प्रत्येक नागरिकांचे ते कर्तव्य आहे. वैयक्तिक पातळीवर त्याचे जतन करणे, किमान त्यांना आपण हानी  पोहोचवणार नाही याकडे लक्ष देणे, प्रबोधन या माध्यमातून ही जागरुकता येऊ शकेल!


            निसर्गात अतिशय वैविध्यपूर्ण जागा आहेत.  जसे त्यात डोंगर, दऱ्या, नदया आहेत तसेच पाणथळ जमिनी आहेत. आपण दलदल म्हणू शकतो. इंग्रजीमध्ये त्यांना वेटलॅन्ड्स असे म्हणतात. पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी आणि जतन करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इराणमधील रामसर शहरात 1971 साली एक जागतिक परिषद आयोजित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने या जागांचे संरक्षण आणि संवर्धन असे विषय हाताळले गेले. या परिषदेपासून पाणथळ जागांना रामसर (जागा) स्थळे म्हणून संबोधले जाऊ लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर या परिषदेतील ठराव 1905 सालापासून अंमलात आला, तर भारतात 1985 सालापासून त्याची अंमलबजावणी चालू झाली.


रामसर ठरावानुसार तलाव, नद्या, दऱ्या, दलदली आणि त्यातील गवताळ प्रदेश खारफुटीची वने, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रवाळ बेटे अशा नैसर्गिक जागा आणि मत्सशेतीची तळी, भातशेती, धरणांचे जलाशय, मिठागरे अशा मानवनिर्मित जागांचा समावेश होतो. ठरावाला मान्यता दिलेल्या देशांना किमान एका जागेचा समावेश यात करावा लागतो. जगभरात सुमारे 2500 च्या आसपास रामसर स्थळे घोषित करण्यात आली आहेत. आपल्या देशात 75 हून अधिक जागांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. तर महाराष्ट्रात 3 जागा आहेत. यामध्ये नांदूर मध्यमेश्वर, लोणार आणि अगदी अलीकडे 2022 मध्ये ठाणे खाडी अशा तीन जागा रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याचा विस्तार सुमारे शंभर चौरस किमी इतका आहे. याठिकाणी  कायम निवासी आणि स्थलांतरीत अशा जवळपास 250 विविध जातीच्या पक्षांची नोंद झाली आहे. केवळ पक्षीच नाही तर इतरही सजीवसृष्टीची इथे रेलचेल आहे. साडेपाचशेहून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती, 30 पेक्षा जास्त मासे प्रजाती, तर 40 पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती- इथे आढळतात. हजारो वर्षापूर्वी अश्नीपात होऊन तयार झालेले लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्हयात आहे. तिथला पाणी साठा क्षारयुक्त आहे. इथेसुध्दा पक्षांच्या सुमारे 160 प्रजाती, 46 प्रकारचे सरीसृप आणि लांडग्यासहीत 12 पेक्षा अधिक सस्तन प्राण्यांची नोंद आहे. फ्लेमिंगोसाठी प्रसिद्ध असलेली ठाणे खाडी (उल्हास नदीची खाडी) याला अगदी अलिकडे रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांचा समन्वय यासाठी महत्वपूर्ण ठरला.


नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असे एका प्रकारचे वर्गीकरण यात आहे. म्हणजे नैसर्गिक रित्या एखादया जागेत पाणी साचून किंवा काही कालावधीसाठी पाणी तसेच राहून पाणथळ जमिनी तयार होतात. निसर्गतः येणारे पूर, त्यातून पाण्याचा निचरा लवकर न होता पाणी साचून राहणे किंवा नद्यांच्या खाड्या हे याचे उत्तम उदाहरणे आहेत.


धरणाचे जलाशय, शेततळी, मिठागरे अशी मानवनिर्मित रामसर स्थळांची उहाहरणे देता येतील. जमा होणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतावरून सुद्धा पाणथळ जागांचे वर्गीकरण करतात. गोड्या/खाऱ्या पाण्यामुळे, लाटांमुळे तयार झालेले, लाटा आणि नदीचे गोडेपाणी यांच्या मिश्रणातून तयार झालेले, नद्यांना येणारे पूर, पावसाचे पाणी साचून तयार झालेले, मानवी हस्तक्षेपामुळे पाणी साचून तयार झालेले यांचा यामध्ये समावेश होतो.


अनेक पाणथळ जागांमध्ये पाण्याचे स्स्रोत हे एकापेक्षा अधिक असतात. त्यामुळे त्यांचे वर्गीकरण ठराविक अशा एका प्रकारात करता येत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तीर्ण / प्रचंड आकाराच्या रामसर स्थळांची उदाहरणे म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं. पश्चिम सैबेरिया, द. अमेरिकेतील पेंटावाल आणि आपल्या भारतातील सुंदरबन ही त्याची उदाहरणे होत.


पर्यावरणासाठी, त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्व मोठे आहे. वस्तुत: पाणथळ जागा या जमीन आणि पाणी यांचे समन्वय साधणाऱ्या असतात. केवळ पशूपक्षी नव्हे तर विविध लव्हाळी, हवा/ऑक्सीजन याच्या पोकळ्या असणाऱ्या वनस्पती, त्यांच्या आधाराने राहणारे सजीव आणि डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्मजीव, एकपेशीय जीव यांनी पाणथळ जागा समृद्ध असतात. बहुतांश खाड्यांमध्ये विविध खारफुटी वनस्पती असतात.


मुख्यत: पूरनियंत्रणासाठी याचा फायदा होतो. नदीला आलेला पूर किंवा समुद्राच्या लाटा यांपासून जवळच्या जमिनीचे संरक्षण पाणथळ जागांमुळे होते. बहुतांश पाणथळ जागा या भूजलाशी जोडलेल्या असतात. त्यामुळे या पाण्याची गुणवत्ता आणि दर्जा राखण्यात या पाणथळ जागा महत्वाची भूमिका बजावतात. भुजल पातळी रिचार्ज करण्याचे काम या माध्यमातून होते. कांदळवन, प्रवाळ, आणि मीठ दलदलीचा प्रदेश हे किनारा संरक्षण आणि वादळापासून बचावाचे काम करतात. जैवविविधता जपण्याचे काम यातून होते.

अभ्यासक आणि पर्यटक या दोहोंसाठी पाणथळ जागा महत्वाच्या आहेत.  इथल्या जैवविविधतेमुळे त्या ठराविक घटकांचा, सजीवांचा अभ्यास तर होतोच, शिवास त्यांच्या परस्परांमधल्या संबंधाचा सुद्धा अभ्यास करता येतो. येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे रोजगारनिर्मितीच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होतात. एका अर्थाने पर्यावरणासोबतच आर्थिक अंगाने सुद्धा पाणथळ जागांचे महत्व मोठे आहे. सजीव आणि निर्जिव अशा अनेक घटकांची मिळून एक समृध्द परिसंस्था पाणथळ जागांमध्ये नांदत असते.


गेल्या काही वर्षामध्ये वाढते औद्योगिकीकरण, भुजलाचा बेसुमार उपसा आणि त्याच्या पुनर्भरणासाठी होणाऱ्या प्रयत्नांची गती कमी असणे, आणि महत्वाचे म्हणजे घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अशा पाणथळ जागांचा वापर यामुळे त्या आक्रसण्याची भीती आहे. याचा परिणाम त्यांची जैवउत्पादकता आणि जैवविविधता यांवर होऊ शकतो. ते जपणे आपल्या सर्वांच्या हाती आहे.

आशिया खंडात रामसर स्थळांच्या बाबतीत भारताचा क्रमांक एक आहे. सर्वात जास्त क्षेत्र भारतात आहे. भारतीय उपखंडातील एकंदरीत पर्यावरणाच्या दृष्टीने पाणथळ जमिनी या जैवविविधता, हवामान, अनुकुलन, गोड्या पाण्याची उपलब्धता आणि एकूणच लोकसंख्येसाठी महत्वाच्या आहेत. भारतात सध्या 75 रामसर स्थळे आहेत. शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर रामसर स्थळांच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रयत्न सुरु झाले.  सन 2013 पर्यंत केवळ 26 जागा (पाणथळ जमिनी) रामसर जागा म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2014 ते 2023 पर्यंत 49 नवीन जागा समाविष्ट करण्यात आल्या.


           ---दीपक चव्हाण, विभागीय संपर्क अधिकारी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या