तडीपार गुंडाचा शिवसेना प्रवेश ठरला चर्चेचा विषय!

  


मुख्यमंत्र्यांसमावेत नितीन मिरपगार झळकला फोटोत  


नगर : राज्यात सध्या राजकीय कोलांट्या उड्या सुरू आहेत. कोण कोणत्या पक्षात जाईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या प्रवेशाबाबत सामान्य नागरिक आता फार गंभीर नसतात. मात्र भ्रष्टाचार मुक्त आणि वेगवान प्रशासन अशी बिरुदावली मिरवणाऱ्या राज्यातील महायुती सरकारमधील घटक पक्षांमध्ये हल्ली गुन्हेगारांचे प्रवेश वाढत आहेत. जिल्ह्यातून तडीपार असलेल्या नेवासा तालुक्यातील एका गुंडाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेश सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. 


दोन दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाची चांगलीच चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या गटातील ज्येष्ठविधीज्ञ के. एच. वाखुरे व भाऊसाहेब वाघ यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश होता. मात्र प्रवेशाच्या फोटोतील एक चेहरा सगळ्यांनाच खटकला.


उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला आणि सोनई पोलिसांनी वाळूज पोलिसांच्या हवाली केलेला विविध गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेला एक आरोपी मुख्यमंत्र्यांसह या प्रवेश सोहळ्याच्या फोटोत झळकला. नितीन मीरपगार असे या आरोपीचे नाव आहे. 

राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक घोटाळ्यांमध्ये हात बरबटलेल्या पुढार्‍यांना भाजप आणि मित्रपक्ष पायघड्या टाकत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ग्रामीण भागातील जनतेचा त्या सगळ्या घडामोडींशी तसा थेट संबंध येत नाही. मात्र आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा गावातील एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा सत्ताधारी पक्षांमध्ये किंवा घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींबरोबर झळकतो, तेव्हा सामान्य माणूस याचा गांभीर्याने विचार करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट नेवासा तालुक्यातील गुन्हेगारीबाबत माहिती नसली तरी त्यांच्यापर्यंत संबंधिताला घेऊन जाणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांना त्याची जाणीव असणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. अलीकडे गुन्हेगारांना राजकारणामध्ये प्रतिष्ठा मिळताना पाहून सामान्य माणूस नक्कीच ओशाळतो. 

________


"प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या आदेशाने नितीन मीरपगार याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. आम्ही त्याला वाळूज पोलिसांकडे हजर देखील केलेले आहे. त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपारचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे". 


- सुरज मेढे, पोलीस उपनिरीक्षक, सोनई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या