कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासिक सभेत आजी-माजी सभापतींमध्ये राडा

 कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण मासिक सभेत आजी - माजी सभापतींमध्ये चांगलाच 'राडा' झाला. 




वैजापूर 


| कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण मासिक सभेत आजी - माजी सभापतींमध्ये चांगलाच 'राडा' झाला. या दोघांमध्ये तुफान शिवीगाळ होऊन प्रकरण धरपकडीपर्यंत गेल्याने तणाव निर्माण झाला होता. अन्य संचालकांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रकरण निवळले.


याबाबत अधिक माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १३ कर्मचाऱ्यांचे प्रकरण वादात आहे. यातील ३ कर्मचारी वगळता अन्य १० कर्मचाऱ्यांबाबत संचालक मंडळात मतमतांतरे होती. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. दहा कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाने होकारार्थी ठराव पारित केलेला आहे. प्रकरण  लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला आहे. याबाबतचे सर्व अधिकार समितीच्या सचिवांना देण्यात आले आहे. बुधवारी या बैठकीत कर्मचाऱ्यांचा विषय निघाल्यामुळे पुन्हा रणकंदन माजले अन् याचे पर्यावसान शिविगाळीत होऊन प्रकरण थेट धरपकडीपर्यंत गेले. सभापती रामहरी जाधव यांनी सचिवांना 'फांदी' मारून कर्मचाऱ्यांच्या लोकअदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रकरणावर सह्या करण्यापासून परावृत्त केल्याचा आरोप माजी सभापती तथा संचालक संजय निकम यांनी बैठकीत केल्यामुळे मुद्दा तापला अन् विषय भरकटला. कर्मचाऱ्यांना रूजू करून सभापतींनी असमर्थता दर्शविल्याने संचालक संजय निकम यांनीही कडाडून विरोध केला. शब्द आणि शब्द वाढत गेल्यामुळे प्रकरण शिविगाळीपर्यंत नंतर धराधरीपर्यंत गेले. साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे हा गोंधळ सुरू होता. अन्य संचालकांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविल्याने प्रकरण निवळले आणि सभा पुन्हा सुरू झाली. दरम्यान याबाबत बाजार समितीच्या सचिवांसह कर्मचाऱ्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून 'चुप्पी' साधली आहे. परंतु असे असले तरी अन्य संचालकांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सभापती रामहरी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'मी लग्नात असल्याचे' सांगून विषयाला बगल देत बोलायचे टाळले. 




व्यापाऱ्याचा परवाना रद्द 


दरम्यान सर्वसाधारण सभेत विविध मुद्दय़ांवर उहापोह झाल्याने सभा चांगलीच वादळी ठरली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये बहुतांश अडत व्यापाऱ्यांनी उधारीत अथवा पोस्ट डेटेड धनादेश देऊन कांदा खरेदीचा सपाटा लावला आहे. हाच मुद्दा संचालकांनी उचलून सभापतींना धारेवर धरले. याचाच परिपाक म्हणजे योगेश घंगाळे या अडत व्यापाऱ्याचा परवाना १५ दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




'त्या' कर्मचाऱ्याची उचलबांगडी 


कांदा मार्केटमध्ये अनागोंदी सुरू असतानाही नियुक्त केलेला कर्मचारी समितीला दैनंदिन अहवाल देत नसल्याचा ठपका ठेऊन त्याच्या काराभारावर  संचालकांनी ताशेरे ओढले. याची दखल घेऊन त्या कर्मचाऱ्याची उचलबांगडी करून कांदा मार्केटसाठी दुसरा कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. 


कांदा मार्केट बंद


मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर अडत व्यापाऱ्यांनी सात दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची होत आहे. शेजारच्या जिल्ह्य़ातील कांदा मार्केट चालू असताना वैजापूरचे मार्केट बंद का?  असा प्रश्न उपस्थित करून या मुद्द्यावरही बैठकीत चांगलेच रणकंदन माजले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या