दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का,ऋषभ पंतवर बीसीसीआयने घातली एका सामन्याची बंदी,

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आहे. 

यासह पंतवर आयपीएलमधील एक सामना खेळण्याची बंदी घालण्यात आली आहे.आयपीएलमधील प्लेऑफची सध्या रोमांचक वळणावर असतानाच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. यासह पंतला ३० लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील सामन्यात ऋषभ पंत खेळू शकणार नाही.

ऋषभ पंतवर का घातली एका सामन्याची बंदी?
७ मे रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाने सामन्यातील षटके वेळेत पूर्ण न केल्याने स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधाराला निलंबित केले आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, जर एखाद्या संघाच्या कर्णधाराने स्लो ओव्हर रेटसंबंधित पहिला गुन्हा केला तर त्याला १२ लाख रुपये दंड आकारला जातो. चालू हंगामात कर्णधाराने दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केल्यास त्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावला जातो. तिसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधारांवर एका सामन्याची बंदी आणि ३० लाखांचा दंड ठोठावला जातो.“आयपीएल आचारसंहितेच्या कलम ८ नुसार, दिल्ली कॅपिटल्सने सामनाधिकारींच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले होते. यानंतर हे अपील बीसीसीआयच्या लोकपालकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आले. लोकपालने व्हर्च्युअल सुनावणी घेतली आणि मॅच रेफरीचा निर्णय योग्य आणि बंधनकार असल्याची पुष्टी केली”, असे आयपीएलच्या निवेदनात म्हटले आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे पंत आता आरसीबीविरूद्धचा महत्त्वाचा सामना खेळू शकणार नाही. प्लेऑफच्या शर्यतीत दिल्लीचा संघ अजूनही कायम आहे आणि या आगामी सामन्यातील पराभवासह ते या स्पर्धेतून बाहेर पडू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या