भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या पेट्रोल पंपावर खंडणीसाठी गोळीबार

 

20 लाख रुपयांची मागणी; कर्मचाऱ्यांशी झटापट अन गोळीबार




मालेगाव : मालेगाव माजी महापौर मलिक यांच्यावर मध्यरात्री गोळीबार झाला तर दुसरीकडे भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ यांच्या पेट्रोल पंपावर खंडणी मागत दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. मालेगाव मध्ये वाढलेल्या गुंडगिरी, खंडणी, हल्ले प्रकरणामुळे सामान्य माणूस चांगलाच हादरलाय. 

तालुक्यातील झोडगे परिसर गोळीबारानं हादरलंय. अज्ञात दोन तरुण दुचाकी वरून आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यानंतर या दरोडेखोरांनी गावठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार करत 'मालकाला सांग 20 पेटी पाठव अन्यथा बघून घेऊ' अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. हा पेट्रोल पंप भाजपाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ यांचा असून घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, याआधी देखील मालेगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी आणि मालेगाव शहरात किरकोळ कारणावरून गोळीबार करण्यात आल्याच्या घटना घडल्यात. मुळात मालेगाव शहर आणि तालुक्यात अनेक बेकायदेशीर पिस्तूल असून यासाठी मालेगावात कॉम्बिंग ऑपरेशनची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या