Dr. Sujay Vikhe : 18 लाख 88 हजार रुपये भरून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी

 




ईव्हीएमवर आक्षेप घेणारे डॉ. सुजय विखे ठरले पहिले भाजपनेते




नगर : 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मतदानासाठी चे इलेक्ट्रॉनिक मशीन (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे. खासदार विखे यांच्या या मागणीचे काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47 हजार 200 रुपये याप्रमाणे एकूण 18 लाख 88 हजार रुपयांचे शुल्कदेखील भरले आहे. ईव्हीएम वर आक्षेप घेणारे विखे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे पहिले पराभूत उमेदवार आहेत. 


दरम्यान पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुजय विखेंनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटातून शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात निवडणूक लढली. अमहदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुजय विखे पाटील यांचा 28 हजार 929 मतांनी पराभव केला. निलेश लंकेंना 6 लाख 24 हजार 797 मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना 5 लाख 95 हजार 868 मते मिळाली. सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात अटीतटीचा लढत झाली. सुजय विखे पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्याविरोधात 2 लाख 81 हजार मतांनी विजय मिळवला होता.

डॉ. विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली, तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे. जर कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होणार आहे.

___________


कुठल्या ईव्हीएमवर आक्षेप..?


अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेवगाव-पाथर्डी 5, कर्जत- जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी माजी खा. डॉ. सुजय विखेंनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या