ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत नागवडे कारखान्यावर उद्या मेळावा.

 



उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत

 नागवडे कारखान्यावर उद्या मेळावा


लिंपणगाव ( प्रतिनिधी)


        महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिला भगिनींकरिता जाहीर केली असून सदर योजना प्रभावीपणे राबविण्यामध्ये श्रीगोंदा तालुका व विशेषतः नागवडे यांच्या  टीमने चांगले काम झाले असून शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे करिता प्रयत्न केले आहेत. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. 22 रोजी दुपारी १ वाजता सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागवडे कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे  व जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे यांनी दिली. 
               उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते असल्यामुळे त्यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक समाज उपयोगी योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना  लोकप्रिय ठरली असून तिची अंमलबजावणी श्रीगोंदा तालुक्यात अतिशय चांगल्या प्रकारे झाली असल्यामुळे अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.  २२ जुलै रोजी १ एक वाजता नागवडे कारखाना कार्यस्थळावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे, राज्याच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,  राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आमदार संग्राम जगताप, राज्य मार्केट कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राज्य पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

          नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी असून या योजनेसंदर्भात ना. अजितदादा पवार हे महिलांशी संवाद साधणार असल्यामुळे काही महिलांना अजित दादांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे महिला भगिनींची उपस्थिती महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्याच दिवशी अजितदादांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे अभिष्टचिंतन व सत्कारही करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राजेंद्र दादा नागवडे व सौ. अनुराधा नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या