अहमदनगर:-उपनगरातील कॅफेमध्ये एका युवतीवर तरूणाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरात राहणार्या पीडित युवतीने या प्रकरणी बुधवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
शोएब मोसीन शेख (रा. पंचपीर चावडी, अंबिका पतसंस्थेच्या समोर, माळीवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी नगरमधील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिची शोएब सोबत ओळख झाली होती. पुढे त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर शोएबने तिला प्रेम असल्याचे बोलून दाखवले. फिर्यादीने त्याला होकार दिला. दरम्यान, जानेवारी- फेब्रुवारी 2024 मध्ये (नक्की तारीख नाही) शोएबने फिर्यादीला सावेडीतील एका कॅफेत बोलून घेतले. तेथील कॅबिनमध्ये त्याने तिच्यावर अत्याचार केला. सदरचा प्रकार झाल्याने फिर्यादी रडू लागली तेव्हा शोएब फिर्यादीला म्हणाला, ‘तू सदर झालेला प्रकार कोणाला सांगितला तर मी तुला व तुझ्या भावाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली.
फिर्यादी घाबरल्याने त्यांनी कोणाला काही सांगितले नाही. त्यानंतरही शोएब फिर्यादीला फोन करून भेटण्यासाठी बोलवत होता. मात्र फिर्यादीने त्याचे फोन घेणे बंद केल्याने बुधवारी (28 ऑगस्ट) तो फिर्यादी काम करत असलेल्या ठिकाणी गेला. ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू मला भेटत नाही व माझा फोन पण घेत नाही, तू जर माझ्याशी बोलली नाही व भेटली नाही तर तुला व तुझे भावाला मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 टिप्पण्या