वंचित आणि आदिवासी समाजाचा संगमनेरच्या नेत्‍यांनी केवळ वापर केला - डॉ. सुजय विखे

आश्वी दि.२४ प्रतिनिधी
वंचित आणि आदिवासी समाजाचा संगमनेरच्या नेत्‍यांनी केवळ वापर केला. आता तुम्ही विखे पाटील साहेबांसोबत आलात तुमचा योग्‍य सन्‍मान ठेवून तुमचे प्रत्येक प्रश्‍न मार्गी लागतील याची ग्‍वाही मी देतो. तुम्‍ही आमच्‍या टाकलेल्‍या विश्‍वासाला कुठेही तडा जावून दिला जाणार नाही. अन्याय सहन करू नका जिथे अन्याय होत असेल तिथे विखे पाटील परिवार कायम आपल्या सोबत राहील असे आश्‍वासन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.

संगमनेर तालुक्यातील विविध गावातील आदिवासी बांधवांनी विखे पाटील यांना पाठिंबा देवून भारतीय जनता पक्षामध्‍ये प्रवेश केला. तालुक्यातील आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, रहिमपूर, शेडगांव. कनकापूर येथील कार्यकर्त्यांनी यावेळी ना. विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठिंबा दिला. आरपीआयचे तालुका अध्‍यक्ष आशिष शेळके उपस्थित होते. या युवकांशी संवाद साधताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्‍या विकास प्रक्रीयेतून सर्व समाज घटकांना न्‍याय दिला जात आहे. विकास प्रक्रीया राबविताना कुठेही धर्म आणि जातीभेद आड येवू दिले जात नाही. त्‍यामुळेच या मतदार संघाचा सामाजिक एकोपा टिकून आहे. भविष्‍यात आपल्‍याही सर्व प्रश्‍नांसाठी विखे पाटील परिवार कटिबध्‍द राहील याची ग्‍वाही डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.  

तालुका अध्‍यक्ष आशिष शेळके यांनी याप्रसंगी बोलताना वंचित समाजाला आणि आदिवासी समाजासाठी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक योजनेच्या माध्यमातून न्याय दिला आहे. या योजना तळागाळात पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणूनच पुढील काळात संगमनेर तालुक्यातील आदिवासी समाज हा सदैव विखे पाटील परिवारांसोबत राहील आणि आपल्या माध्यमातून येणाऱ्या काळात चांगलं काम करून समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी यावेळी आदिवासी संघटनेचे संघटक जगदीश बर्डे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, दीपक बर्डे, संग्राम शेळके, अॅड.कौसाबाई जाधव, रवींद्र शेळके यांच्यासह तालुक्यातील आदिवासी बांधव आणि महिलांनी प्रवेश केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या