Fire : बस पेटली अन् टोलनाकाही जळाला..!

 टायर फुटून ट्रॅव्हल्स बसला आग,
आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक,
जीवितहानी टळली



खडका टोलनाक्यावरील पहाटेची घटना

राष्ट्र सह्याद्री / सुधीर चव्हाण 



नेवासा : 

अहमदनगर संभाजीनगर रोडवरील नेवासा  पोलीस ठाणे अंतर्गत नेवासा हद्दीतील खडका टोल नाका येथे एका खाजगी साईराम ट्रॅव्हल्स कंपनीच्या लेलंड प्रवासी बसचा टायर फुटल्याने सदरची ट्रॅव्हल जळून खाक झाल्याची घटना घडली प्रवाशांनी सावधानता बाळगत उतरून घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. बसमध्ये 15 प्रवाशी होते. सदरची घटना बुधवारी दि.२३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास घडली. सदरच्या घटने प्रसंगी खडका येथील टोल बूथ ही जळून खाक झाले आहे. 



   या घटनेची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पुणे येथून जामोदकडे जाण्यासाठी साईराम कंपनीची ट्रॅव्हल्स बस एम एच-१९-वाय-३१२३ ही बस पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खडकाफाटा येथील टोल नाक्यावर आली तेथेच या बसचे चाक फुटले व बसने पेट घेतला या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून बस मधून उतरून घेतले.टायर फुटून बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच ड्रायव्हरने पलायन केले असल्याची माहिती उपस्थित जनसमुदायाकडून मिळाली.



   सदर बसमध्ये एकूण तीस प्रवाशी होते यामध्ये या बसने अगोदर घोडेगाव जवळील जिओ कंपनीच्या जवळील पेट्रोल पंपावर पेट घेतला यावेळी बस मध्ये बसलेल्या अंदाजे वीस महिलांना उतरवून इतर बसमध्ये बसविण्यात आले.पेटलेली बस विझवल्यानंतर पुन्हा बस संभाजीनगरकडे जाण्यासाठी निघाली असे बस मध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने सांगितले

      सदरची बस ही नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या खडका टोल नाक्यावर आल्यावर गाडीचे टायर फुटून पुन्हा बसने पेट घेतला.लाईनर जाम झाल्याने ट्रॅव्हल बसचे  टायर फुटले व ट्रॅव्हल्सने पेट घेतला अशी माहिती मिळाली.बसमध्ये बसलेल्या दहा प्रवाशांनी वेळीच उतरून घेतल्याने जीवितहानी टळली.पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठवले.यावेळी टोल नाक्याच्या वतीने भेंडे येथील अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले.अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.मात्र तोपर्यंत गाडी पूर्ण जळून खाक झाली होती.

   टोल नाक्याच्या बूथ जवळच ट्रॅव्हल्स बसने पेट घेतल्याने टोल नाक्यावरील बूथसह वायरिंगचेही मोठे नुकसान झाले असल्याचे टोलनाका व्यवस्थापक विलास देसले यांनी सांगितले. एक ते दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात येईपर्यंत संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागल्याने हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या