Crime : पाथर्डीच्या व्यापारी कुटुंबाला केडगावात लुटले!

 

कोयत्याने मारहाण करीत 4 लाख 60 हजारांचे दागिने लंपास

प्रतिकात्मक छायाचित्र...


नगर : केडगाव येथे पुणे रस्त्यावरील हॉटेल कन्हैयाच्या पार्किंगमध्ये मोटारकार उभी करून रितेश पटवा यांचे कुटुंब विश्रांतीसाठी थांबले होते. तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना उठविले. मोटारीचा दरवाजा उघडताच मारहाण करून महिलांच्या गळ्यातील चार लाख 60 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

बुधवारी (दि. 4) घडलेल्या या प्रकाराबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत रितेश सुरेश पटवा (रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पटवा व त्यांचे कुटुंबीय मोटारीने नातेवाइकांच्या लग्नाला पुण्याला गेले होते. मंगळवारी दुपारी विवाह सोहळा आटोपून ते नगरमार्गे पाथर्डीकडे जात होते. नगरजवळील केडगाव बाह्यवळण चौकात येईपर्यंत पहाट झाली होती. चालकाला झोप आल्याने त्यांनी नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल कन्हैयाच्या पार्किंगमध्ये मोटारकार उभी केली आणि मोटारीतच सर्वजण झोपले. पहाटे अचानक तीन अनोळखी तरुण आले. चला उठा उठा. घाबरू नका, असे म्हणून त्यांची काचेवर थाप मारली. फिर्यादीच्या आईने दरवाजा उघडला असता त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्यास सुरुवात केली. रितेश पटवा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना कोयत्याच्या मुठीने मारहाण करण्यात आली. चोरट्यांनी आई व पत्नीच्या गळ्यातील दागिने असा 4 लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, घटनास्थळी उपअधीक्षक अमोल भारती, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाने पाहणी करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या