गोड संक्रांतीच्या मुहूर्तावर श्रीरामपुरात कटुता...
श्रीरामपूर : ऐन संक्रांतीच्या दिवशी श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये यांना त्यांच्या मेन रोडवरील पवन सुपारी या दुकानात अर्ध्या तासापूर्वी चार पाच जणांनी येऊन लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली व ते पळून गेला. तिळगुळ घ्या गोड गोड बोला, असा मित्रत्वाचा, बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या संक्रांत सणाच्या दिवशी श्रीरामपूर शहरात एका टोळक्याने दुकानात घुसून उपाध्ये यांना मारहाण केल्याने संक्रातीच्या मुहूर्तावर श्रीरामपूरकरांनी कटुतेचा अनुभव घेतला.
ही माहिती मिळताच आमदार हेमंत ओगले, करण ससाणे, शिवसेनेचे संजय छल्लारे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व सर्व कार्यकर्ते तिथे जमा होऊन त्यांनी मारहाण करणाऱ्या गुंडांना त्वरित अटक करावी, अन्यथा गाव बंद ठेवले जाईल, असा इशारा दिला.
डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे सर्व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
दरम्यान जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत श्रीरामपूर बंद ठेवू, असा इशारा श्रीराम तरुण मंडळातर्फे गौतम उपाध्ये, राजेंद्र सोनवणे व इतर कार्यकर्त्यांनी दिला आहे. या घटनेने शहरातील वातावरण तंग झाले आहे.
पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, नागरिकांनी शांतता ठेवावी, असे आवाहन डीवायएसपी डॉ. शिवपुजे यांनी केले.
0 टिप्पण्या