संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर शहराच्या हर्सूलमधून 31 जुलैला बेपत्ता झालेल्या छावा संघनटनेचा शहर प्रमुख सचिन पुंडलिक औताडे यांचा प्रेम प्रकरणातून गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कॅनॉट भागात त्यांच्या प्रेयसीने तिच्या मामेभावाच्या मदतीने सचिन यांचा काटा काढला. पैठणला गोदावरी नदीत त्याचा मृतदेह फेकला. वाहत गेलेला हा मृतदेह मुंगी गावात येथे तरंगत काठावर आला. त्यानंतर या खुनाला वाचा फुटली. अहिल्यानगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवित चार दिवसांत 2 आरोपींना बेड्या ठोकल्या. अद्याप एक आरोपी पसार आहे. दुर्गेश मदन तिवारी, भारती रवींद्र दुबे (छावा संघटनेची महिला प्रदेशाध्यक्ष) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अफरोज खान हा पसार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे. सचिन औताडे त्याच संघटनेत काम करीत होते. ते दोघेही विवाहित आहेत. मात्र, भारतीने फारकत घेतली होती. सचिन आणि भारतीचे प्रेमसंबंध होते. भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. ते विवाहित असल्याने ते नकार देत होते. भारती पतीपासून वेगळी झाली असून, एकटी कॅनॉट प्लेसमध्ये राहत होती. भाऊ असल्याचा दावा करणारा दुर्गेश फार्मसीचे शिक्षण घेऊन एका औषधी कंपनीत नोकरीला आहे.तर फरार असलेला आरोपी अफरोज वाहन खरेदी-विक्री एजंट आहे. भारती व सचिन चार वर्षापासून एका संघटनेत काम करत होते. ती राज्य महिला प्रदेशाध्यक्ष असून, सचिन शहराध्यक्ष होते. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. 31 जुलै रोजी दोघांनी दारू खरेदी केली. कॅनॉट प्लेसच्या फ्लॅटवर मामेभाऊ दुर्गेशही सहभागी झाला. भारतीने मध्यरात्री अफरोजलादेखील बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्यात वाद झाले. तिघांनी बेदम मारहाण करत सचिनवर चाकूने वार करत जिवे मारल्याची माहिती समोर आली आहे.

0 टिप्पण्या