तीन लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक
आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनल्सजवळ उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या राहाता (जि. अहिल्यानगर) येथील पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या संशयितांकडून तीन लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
संतोष कचरू भागवत यांचे आडगाव ट्रक टर्मिनल्स येथे ट्रान्स्पोर्ट कार्यालयासमोर लावलेल्या ट्रकमधून सोमवारी (ता. ११) रोजी अज्ञात चोरट्यांनी डिझेलची चोरी केली होती. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी डिझेल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, ही चोरी राहाता येथील संशयित प्रसाद दत्तात्रेय वाडेकर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती आडगाव गुन्हे शोध पथकाला मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून संशयित प्रसाद दत्तात्रेय वाडेकर याला निफाड येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, अमोल अविनाश कुंदे, धनंजय अविनाश कुंदे, अजय राजू भोसले आणि बाबासाहेब दगडू राऊत यांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी या चौघांनाही अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे, गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सतीश जगदाळे, हवालदार दादासाहेब वाघ, इमान शेख, नीलेश काटकर, मगर, सुरंजे, दीपक भुजबळ, पडोळ, अक्षय गोसावी, राठोड, गुंबाडे, वाघचौरे आणि वैशाली महाले यांनी केली.
0 टिप्पण्या