आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतली. आता संगमणेरमधील कीर्तनात झालेल्या वादानंतर हभप संग्रामबापू भंडारे चर्चेत आले. धार्मिक ध्रुवीकरणाचा संग्रामभैय्या ते संग्रामबापू हा पॅटर्न समाजाला कुठे घेऊन जात आहे? ही वेळ का आली. निवडणुकामध्ये धर्मकेंद्रित मतदान का झाले? ते योग्य आहे का? राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश जरूर असावा, मात्र धार्मिक व्यासपीठावरूनच राजकारण चालावे का? याचाही विचार करण्याची आता वेळ आली आहे.
संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या समृद्ध असलेला भाग. गेल्या काही दिवसांपासून एका विवादामुळे चर्चेत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण झाले. धार्मिक ध्रुवीकरणामुळे विधानसभेला कधी नव्हे तो माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला. त्यांच्यासमोर अतिशय नवखे असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ विजयी झाले. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव असलेले माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा संगमनेर विधानसभा मतदारसंघ किंवा अहिल्यानगर जिल्ह्यालाच नव्हे तर सबंध महाराष्ट्रासाठी धक्कादायक होता. निवडणुकीच्या वर्षभरानंतरही या पराभवाची चर्चा होते.
अमोल खताळ हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार झाले आणि आमदार झाले. विधानसभा सदस्य या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने जाती धर्म भेद करणे अपेक्षित नाही. निवडून आलेला आमदार हा सबंध समाजाचा असतो. मात्र अलीकडच्या काळात हा संदर्भ बऱ्या प्रमाणात बदलला असल्याचे दिसून येते. निवडणुकीनंतर पुणे दोन्ही काढण्याची परंपरा आता रूढ होऊ लागली आहे. त्यातून सामाजिक धार्मिक द्वेष निर्माण केले जातात. गेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा प्रकार प्रकर्षाने जाणवला.
अहिल्यानगर मतदारसंघाचे आमदार संग्राम भैय्या जगताप हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारसरणीत तयार झालेले संग्राम भैय्या अलीकडे महायुतीच्या प्रभावात अधिकच हिंदुत्ववादी झाले. त्याचे कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत त्यांना मुस्लिम बहुल वार्डांमध्ये पडलेली कमी मतं. गेल्या अनेक वर्षात हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवत नगर शहरांमध्ये राजकीय पटलावर नावलौकिक मिळविलेले आमदार संग्राम जगताप अलीकडे प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आले. त्याचा उल्लेख करताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील 'संग्राम भैय्यांनी मला मागे टाकले' अशी टिप्पणी केली होती. वास्तविक विखे पाटील हे जगताप यांच्या पूर्वी हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार झाले. मात्र जगताप यांनी विधानसभेनंतर हिंदुत्वाच्या दिशेने वेग अधिक वाढविला, असे माजी खासदार विखे पाटील यांना म्हणायचे असेल. विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम जगताप यांनी रस्त्यावरील मशिद-मदरसे यांचे अतिक्रमण काढण्याचा मुद्दा असो, की शनेश्वर देवस्थानातील मुस्लिम कर्मचारी हटविण्याचा मुद्दा असो, अतिशय प्रखरतेने हिंदुत्ववादी भूमिका मांडली. त्याची राज्यभर चर्चा झाली. हिंदुत्वाचा 'संग्रामभैय्या पॅटर्न' चर्चेत आला. हिंदुत्ववादी सभासमारंभांमध्ये त्यांना आमंत्रित केले जाऊ लागले. , विशेषतः धार्मिक स्थळांबाबत, त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि ‘हिंदू रक्षक’ म्हणून मिळालेली ओळख यामुळे त्यांच्यावर कट्टरवादी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. हिंदू संघटनांनी त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे काढले, तर मुस्लिम समाजाने त्यांच्या वक्तव्यांविरोधात आंदोलने केली. या घटनांनी स्थानिक पातळीवर धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी घातले.
आता संगमनेर तालुक्यात झालेल्या हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांच्या बद्दल बोलू. ह. भ. प. संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनादरम्यान मुस्लिम समाजाविषयी केलेल्या कथित वक्तव्यांमुळे गोंधळ उडाला, ज्यामुळे महाराजांना धक्काबुक्की आणि त्यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याचे सांगितले गेले. या प्रकरणाने स्थानिक पातळीवर तणाव निर्माण केला असून, राजकीय आणि सामाजिक परिमाणांनी याला अधिक जटिल स्वरूप प्राप्त झाले आहे.
17 ऑगस्ट 2025 रोजी संगमनेर तालुक्यातील एका गावात ह. भ. प. संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. संग्राम बापू हे त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि समाज प्रबोधनाच्या कीर्तनांसाठी ओळखले जातात. या कीर्तनादरम्यान त्यांनी मुस्लिम समाजाविषयी काही वक्तव्ये केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे उपस्थितांमध्ये असंतोष निर्माण झाला. यानंतर काही लोकांनी कीर्तनात गोंधळ घातला, महाराजांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. या घटनेनंतर पोलिसांनी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील काही आरोपी काँग्रेस कार्यकर्ते असल्याचा दावा केला जात आहे. संग्राम बापू यांनी आमदार अमोल खताळ यांची स्तुती करताना अप्रत्यक्षपणे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल नकारात्मक वक्तव्य केलं. त्याचा गावकऱ्यांनी विरोध केला म्हणून वाद उफाळला.
संग्राम बापू भंडारे यांचे कीर्तन हे केवळ धार्मिक प्रबोधनापुरते मर्यादित नसून, त्यात सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांचा समावेश असतो. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आणि प्रखर वक्तृत्व यामुळे ते काही वर्गात लोकप्रिय असले, तरी त्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यताही असते. या घटनेत त्यांनी मुस्लिम समाजाविषयी केलेली वक्तव्ये ही वादाला कारणीभूत ठरली.
संगमनेर तालुका हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा गड मानला जातो. येथील राजकीय समीकरणे अत्यंत संवेदनशील आहेत. या घटनेत काही आरोपी काँग्रेस कार्यकर्ते असल्याचा आरोप झाला आहे, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला. शिवसेना आणि महायुतीच्या समर्थकांनी हा हल्ला नियोजित असल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेसने हे आरोप फेटाळले आहेत.
मुळात बाळासाहेब थोरात यांची आणि संगमनेर तालुक्याची ती संस्कृती नाही. राजकारणात सोबत नसले तरी थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. 'संगमनेरच्या सहकारी व सहकारी बँकांमधील ठेवी आज 7000 कोटींच्या घरात आहेत, संगमनेरात रोज 9 लाख लिटर दूध तयार होते, संगमनेरमधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज 7 लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. संगमनेरमध्ये 5 मेडिकल कॉलेज आहेत, ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत, म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून 25000 मुले-मुली उच्च शिक्षण घेतात. प्रवरा नदीला पाणी नसतांना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, आता निळवंडे धरणातून 24 तास स्वच्छ पाणी भेटते', याकडे आमदार तांबेंनी लक्ष वेधलं. हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम्-सुफलाम् झाला, यात स्वातंत्र्य सेनानी (कै.) भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे, जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही. कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टीका ही राजकीय तर, आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे', अशी चिंता आमदार तांबे यांनी म्हटले.
संगमनेर तालुका हा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असला, तरी येथे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र राहतो. अशा परिस्थितीत धार्मिक किंवा सामुदायिक मुद्द्यांवर केलेली वक्तव्ये तणाव निर्माण करू शकतात. संग्राम बापूंच्या कथित वक्तव्यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या, ज्यामुळे काहींनी आक्रमक पवित्रा घेतला.
या घटनेमुळे स्थानिक पातळीवर हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाची भीती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी संग्राम बापूंच्या समर्थनार्थ, तर काहींनी त्यांच्या वक्तव्यांवर टीका केली आहे. अशा घटना समाजात फूट पाडण्याचे काम करू शकतात.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि कीर्तन परंपरा ही सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा आहे. परंतु, अशा घटनांमुळे कीर्तनासारख्या पवित्र मंचाचा वापर राजकीय किंवा सामुदायिक वादासाठी होत असल्याची टीका होऊ शकते. यामुळे कीर्तनकार आणि त्यांना मानणाऱ्या भाविकांच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल केला असला, तरी अशा प्रकरणांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. विशेषतः संवेदनशील भागात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील.
ही घटना केवळ एका कीर्तनातील गोंधळापुरती मर्यादित नसून, ती आपल्या समाजातील खोलवर रुजलेल्या समस्यांचे प्रतिबिंब आहे. संग्राम बापूंची वक्तव्ये खरोखरच आक्षेपार्ह होती की त्यांना चुकीच्या पद्धतीने समजून घेतले गेले, याचा तपास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, कीर्तनासारख्या मंचाचा वापर सामाजिक प्रबोधनासाठी होणे स्वागतार्ह असले, तरी त्यातून समाजात फूट पडणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राजकीय पक्षांनी या प्रकरणाचा वापर आपापल्या हितासाठी करू नये. काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेले आरोप आणि त्याला उत्तर देताना शिवसेना-महायुतीच्या समर्थकांनी उचललेली पावले यामुळे स्थानिक पातळीवरील वातावरण अधिक तणावपूर्ण होऊ शकते. याऐवजी सर्व पक्षांनी संयम राखून सामाजिक सलोखा राखण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्थानिक पातळीवर हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांनी एकत्र येऊन संवाद साधावा. अशा घटनांमुळे निर्माण झालेला गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.
कीर्तनकारांनी आपल्या मंचाचा वापर समाजाला एकत्र आणण्यासाठी करावा. धार्मिक आणि सामाजिक संवेदनशीलता लक्षात घेऊन वक्तव्ये करणे गरजेचे आहे. सुगंध वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी असलेले श्रीक्षेत्र देवगड चे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्यासारख्या थोर संतांनी पुढे येऊन आता कीर्तनकारांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.
पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. संवेदनशील भागात कीर्तनासारख्या कार्यक्रमांसाठी विशेष खबरदारी घ्यावी. या घटनेनंतर सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे तणाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने खोट्या बातम्यांवर नियंत्रण ठेवावे आणि लोकांना संयम राखण्याचे आवाहन करावे.
थोडक्यात, संगमनेरमधील ही घटना आपल्या समाजातील संवेदनशीलता आणि राजकीय ध्रुवीकरणाचे द्योतक आहे. ह. भ. प. संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनातील वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद आणि त्यानंतरच्या हिंसक प्रतिक्रिया यामुळे स्थानिक समाजात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे, जेणेकरून दोषींवर कारवाई होऊ शकेल आणि भविष्यात अशा घटना टाळता येतील. समाजातील सर्व घटकांनी संयम आणि संवादाच्या मार्गाने या समस्येचे निराकरण करावे, जेणेकरून संगमनेरचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा अबाधित राहील. राजकारणातील संग्राम भैय्या यांचा पॅटर्न असो की कीर्तनकार संग्राम बापू, विविध सामाजिक घटकांनी सामाजिक ऐक्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी केवळ कीर्तनात वक्तव्य केले नाही तर त्याच वक्तव्यावर ठाम राहून सोशल मीडिया त्यांनी थोरात विरुद्ध 'नथुराम' होण्याची तयारी दाखवली. ही थोरात यांना जीवे मारण्याची धमकी असल्याचे मानले जाते. कीर्तनकार अशी जहाल भूमिका घेऊ लागले तर सामाजिक शांततेचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सत्ताधारी गटातील अनेक आमदारांनी ही संग्राम बापूंच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यातून त्यांनी काय तो बोध घ्यावा. हा हिंदुत्वाचा संग्राम बापू पॅटर्न हा पुरोगामी महाराष्ट्रालाच काय परंतु वारकरी संप्रदायाच्या शिस्तीलाही न शोभणारा आहे हे नक्की..!
0 टिप्पण्या