नाशिक
गेल्या दीड दशकापासून नाशिक- अहिल्यानगर व मराठवाडा भागात गोदावरी नदीच्या पाणीवाटपावरून सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) समन्यायी पाणीवाटपाचा नवा अहवाल आता मराठी भाषेत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.या अहवालावर नागरिक व शेतकऱ्यांनी अभिप्राय व हरकती एका महिन्याच्या आत नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्राधिकरण अंतिम निर्णय घेणार आहे.
हा अहवाल १८ ऑगस्टला प्रकाशित झाला असून, यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये तो इंग्रजीत प्रसिद्ध झाला होता. मात्र सर्वसामान्यांना त्यातील तांत्रिक बाबी समजण्यास अडचण येत असल्याने मराठीत आवृत्ती देण्याची मागणी होती. त्यानुसार हा अहवाल आता मराठी भाषेतही उपलब्ध झाला आहे.
वस्तुनिष्ठ व वास्तववादी अहवाल
मांदाडे समितीने बदलत्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करून निरीक्षणे मांडली असल्याने हा अहवाल अधिक वास्तववादी असल्याचे मानले जाते. आता नागरिकांचे अभिप्राय व हरकती आल्यानंतर यावर अंतिम निर्णय होईल.
मेंढेगिरी समितीच्या अहवालाला विरोध
मेंढेगिरी समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. या समितीने जायकवाडी धरणाची प्रत्यक्ष साठवण क्षमता, प्रकल्प अहवालातील गृहीतके, नगर व नाशिक जिल्ह्यांतील लाभधारकांना दिलेली आश्वासने यांचा विचार न करता फक्त जायकवाडी धरण भरण्यावरच भर दिला असल्याची टीका करण्यात आली होती. त्यामुळे भंडारदरा व मुळा प्रकल्पातील लाभधारकांवर अन्याय होणार असल्याचे नमूद करून विशेषतः अहिल्यानगरमध्ये या अहवालाला प्रखर विरोध झाला होता.
६५ टक्के विरुद्ध ५८ टक्के पाणीसाठ्याचा मुद्दा
२०१३ मध्ये मेंढेगिरी समितीने जायकवाडी धरणात कायम ६५ टक्के पाणीसाठा राखावा, अशी शिफारस केली होती. मात्र तत्कालीन महासंचालक प्रमोद मांदाडे यांच्या समितीने जुलै २०२३ मध्ये केलेल्या पुनर्विलोकनानंतर हा टक्का कमी करून ५८ टक्के ठेवण्याचे सुचविले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांतून समन्यायी पाणी सोडावे लागत होते. परंतु सात वर्षांत जायकवाडीतील पाणी ६५ टक्क्यांवरच असल्याने प्रत्यक्षात पाणी सोडण्याची वेळ आली नव्हती.
बदलती परिस्थिती व विविध घटकांचा सारासार विचार करून गोदावरी पाणीवाटप अहवाल सादर करण्यात आला आहे. तो वस्तुनिष्ठ मांडण्याचा प्रयत्न आहे.
- प्रमोद मांदाडे, निवृत्त महासंचालक (मेरी), अध्यक्ष, गोदावरी अभ्यासगट समिती
0 टिप्पण्या