अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू;
अवसरी बुद्रुक गावात शोककळा
अवसरी बुद्रुक (प्रतिनिधी) –
मंचर येथून अवसरीकडे जात असताना दोन चुलत भावांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री सुमारास घडली. मंचर–शिरूर रस्त्यावर सुरेश भोर यांच्या घराजवळील कॅनॉलजवळ, मोरीजवळ रात्री दहाच्या सुमारास दुचाकी गाडी घसरल्याने थेट ३० फूट खोल खड्ड्यात असलेल्या पाण्यात कोसळली. या अपघातात आकाश बाळासाहेब जाधव (वय २८) व मयूर संपत जाधव (वय २३) हे दोघेही जागीच बुडाले.
अपघात घडल्यानंतर काही वेळातच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व पाण्यात अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. तत्काळ त्यांना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय, मंचर येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे अवसरी बुद्रुक गावात शोककळा पसरली आहे.
मृतांपैकी आकाश जाधव याचा लॉन्ड्रीचा व्यवसाय होता, तर मयूर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होता. दोघेही चुलत भाऊ असून गावात त्यांचा चांगला वावर होता. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी गावात पोहोचताच मित्र परिवार, नातेवाईक, व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. शोकाकुल वातावरणात अश्रूंचा पूर उसळला.
घटनेची माहिती मिळताच आमदार दिलीप वळसे पाटील, प्रदीप दादा वळसे, विष्णू काका हिंगे व निलेश स्वामी थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन शोकाकुल कुटुंबियांना धीर दिला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंचर–शिरूर रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. अवसरी फाटा ते निरगुडसर फाटा या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वारंवार अपघात होत आहेत. अनेक वाहनचालकांना खड्डे चुकवताना प्राण गमवावे लागले आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेची ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.
या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या