ममदापुर प्रतिनिधी (युनूस इनामदार):-
महाराष्ट्र रायफल असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन – मार्च २०२६ या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी राहता पिस्तूल अँड रायफल शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत कार्यरत डी के स्पोर्ट्स क्लब, लोणी येथील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा दिनांक २८ व २९ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सिद्धांत गौरव बोर्डे, वेदांत गौरव बोर्डे, कार्तिक इंद्रभान भुसारी, साहिल सलीम बेग व जानवी प्रकाश कडू यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, शिस्त व मेहनतीच्या जोरावर ही निवड मिळवली आहे.
या यशस्वी खेळाडूंना राहता पिस्तूल अँड रायफल शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे प्रशिक्षक तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दीपक रणपिसे व सुशांत शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नेमबाजी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या या निवडीबद्दल डी के स्पोर्ट्स क्लबच्या वतीने खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या असून राहता तालुका व प्रवरा परिसरातून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी स्पर्धेत हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या