तरुणीला शाळेत नोकरी देण्याचे आमिष....
माजी महापौर अभिषेक कळमकरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा; अटकेची शक्यता
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर यांच्याविरोधात २५ वर्षीय तरुणीने शारीरिक आणि मानसिक छळाचा गंभीर आरोप करून तक्रार दाखल केली आहे. शाळेत नोकरी लावण्याचे आम्हीच दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अभिषेक कळमकर यांच्याविरुद्ध बलात्कार विनयभंग धमकी तसेच स्त्री सन्मानाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अपडेटनुसार, कळमकर यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून, वैद्यकीय पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, कळमकर यांनी शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संपर्क वाढवला. कळमकर यांनी अहिल्यानगर शहरातील विविध ठिकाणी आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजवर वारंवार अत्याचार केले. पीडितेने मोबाईल व्हिडिओ कॉलद्वारे कपडे काढण्यास भाग पाडणे, अत्याचाराचे व्हिडिओ कॅप्चर करून ब्लॅकमेल करणे आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी पीडितेकडून सुपूर्द केलेले व्हिडिओ पुरावे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून, मोबाईल फोन आणि लॉज रेकॉर्डची तपासणी सुरू आहे. पोलिस सूत्रांनुसार, प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता, लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, कळमकर कुटुंबीयांनी हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले आहे. अभिषेक कळमकर यांच्या पत्नीने माध्यमांना सांगितले की,
"हे राजकीय षडयंत्र आहे. आमच्या परिवाराची प्रतिमा खराब करण्यासाठी विरोधकांनी हा खटला रचला आहे. अभिषेक नेहमीच महिलांच्या सन्मानासाठी काम करतात आणि त्यांना अशा आरोपात गोवणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे."
कुटुंबीयांच्या वतीने वकीलांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या आरोपांत विसंगती असून, ते न्यायालयात सिद्ध करतील. कळमकर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून, ते निर्दोष सिद्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. कुटुंबीयांनी पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र हे प्रकरण निवडणुकीपूर्वीच्या राजकीय हल्ल्याचा भाग असल्याचे म्हटले आहे.
.jpeg)
0 टिप्पण्या